शौचालयांची होणार तपासणी 

नीलेश डोये
सोमवार, 24 एप्रिल 2017


जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कुटुंबाकडे शौचालय बांधण्यात आलेत किंवा काय. त्याचा वापर होत आहे की नाही. किती कुटुंब नव्याने तयार झाले, याची माहिती घेण्यात येणार आहे. 
- कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर 

नागपूर - नागपूर विभागातील नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्हे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अनेकांकडे अद्याप शौचालय नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाने नागपूर विभागातील प्रत्येक शौचालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशाला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरी शौचालयाचा संकल्प केंद्र शासनाचा आहे. यासाठी शासनाकडून प्रत्येक राज्याला उद्दिष्ट दिलेत. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला निश्‍चित मुदतीत सर्व कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी प्रतिलाभार्थी कुटुंबास 12 हजार अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येतात. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्हे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ तालुके हागणदारीमुक्‍त जाहीर केले. तर, गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका अद्याप हागणदारीमुक्त जाहीर केला नाही. शासकीय माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात 2,98,886, वर्धा जिल्ह्यात 1,97,146, गोंदिया जिल्ह्यात 2,26,708, तर, भंडारा जिल्ह्यात 2,11,700 लोकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. मात्र, यातील अनेकांना शौचालयच नाही. काहींना शौचालयाचे अनुदानच मिळाले नसल्याच्या तक्रारी शासनाकडे मिळाल्या आहेत. कागदावरच सर्वांकडे शौचालय दर्शवित तालुका हागणदारीमुक्त करण्यात आल्याचेही आरोप होत आहे. त्यामुळे आता शासनाने हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आलेल्या तालुक्‍यातील मंजूर शौचालयांची तपासणी करून सॅटेलाइटच्या मदतीने नोंदणीही करण्यात येणार आहे. परिणामी, शौचालय बांधणीत झालेल्या घोळप्रकरणी समोर येणार आहे. 

जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कुटुंबाकडे शौचालय बांधण्यात आलेत किंवा काय. त्याचा वापर होत आहे की नाही. किती कुटुंब नव्याने तयार झाले, याची माहिती घेण्यात येणार आहे. 
- कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर 

Web Title: Toilets will be checked in Vidarbha