विदर्भात चार लाख क्विंटल तूर शिल्लक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

एकीकडे खरीप हंगाम तोंडावर असताना प्रश्‍न सुटला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच आहे. राज्य सरकारने तूर खरेदीला मुदतवाढ दिली खरी मात्र केवळ 1 लाख क्विंटलच तूरखरेदी करण्याची दर्शविली आहे.

नागपूर - केंद्र शासनाने राज्य सरकारला एक लाख क्विंटल तूरखरेदीचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले. मात्र, विदर्भात अद्याप 4 लाख क्विंटलहून अधिक तूर शिल्लक आहे. त्यामुळे खरेदीनंतरही उत्पादकांची कोंडी कायम आहे. त्यामुळे मातीमोल दराने खासगी व्यापाऱ्यांना तूर विकण्याची वेळ आली आहे.

केंद्राने राज्यसरकारला पुन्हा एक लाख क्विंटल तूर खरेदीची मंजुरी दिली. त्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तूर खरेदी करण्यासंबंधीचे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला पाठविले. बुधवारी सुटी असल्याने आता गुरुवारी हे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सर्व केंद्राना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुरुवारपासून हमीभावाने तूरखरेदीस प्रारंभ होईल. राज्य सरकारने आधी 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूरखरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यानंतर जवळपास 10 लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांजवळ शिल्लक होती. सरकारच्या या भूमिकेने तूर उत्पादकांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर असताना प्रश्‍न सुटला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच आहे. राज्य सरकारने तूर खरेदीला मुदतवाढ दिली खरी मात्र केवळ 1 लाख क्विंटलच तूरखरेदी करण्याची दर्शविली आहे. त्यामुळे पुन्हा विदर्भात तीन लाख क्विंटल तुरीचा प्रश्‍न कायम आहे. तूरखरेदीवरून दररोज समीकरण बदलत असल्याने खासगी व्यापारीसुद्धा खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. तर काही व्यापारी या संधीचा पुरेपूर फायदा उठवून घेत आहे. तूर उत्पादकांची कोंडीचा फायदा घेत 3 ते 4 हजार रुपये क्विंटलप्रमाणे तूरखरेदी करून उत्पादकांच्या मजबुरीचा फायदा घेत आहे. कोंडीमुळे शेतकरी रडकुंडीस आला असतानादेखील सरकारला मात्र त्यांच्या वेदनाची जाणीव नसल्याची चित्र आहे.

जिल्हानिहाय शिल्लक तूर
(क्विंटलमध्ये)
नागपूर - 61 हजार
अकोला -56 हजार
अमरावती - 1 लाख 82 हजार
चंद्रपूर - 30 हजार
यवतमाळ - 40 हजार
वर्धा - 20 हजार

Web Title: toor pulse a major issue in vidarbha