केंद्र सरकार तब्बल ३१९ शेतकऱ्यांचा 'सन्मान' हिसकावणार; बोगस लाभार्थ्यांची यादी तयार

रजतकुमार खाडे 
Tuesday, 17 November 2020

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची व्यवस्था आहे. मात्र योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी काही निकष असून, कर भरणारे योजनेसाठी पात्र ठरू शकत नसल्याचा मुख्य निकष आहे

महागाव ( जि. यवतमाळ ) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत महागाव विभागातील 319 कर भरणाऱ्यांच्या खात्यांवर निधी जमा झाला आहे. कर भरणारे लोक योजनेसाठी पात्र नसल्याने अशा लोकांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले आहेत. तशी नोटीस तहसील कार्यालयाने 339 लाभार्थ्यांना बजावली आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची व्यवस्था आहे. मात्र योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी काही निकष असून, कर भरणारे योजनेसाठी पात्र ठरू शकत नसल्याचा मुख्य निकष आहे; तरीही काही शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज केले होते. 

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

प्राथमिक टप्प्यांत असे लाभार्थी पात्र ठरल्याने त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने निधी जमा झाला आहे. काही जणांच्या खात्यावर दोन; तर काही जणांच्या खात्यात तीन, चार व पाच हप्ते जमा झाले आहेत. मात्र खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर अर्जधारकांची छाननी झाल्यावर काही लाभधारक हे कर भरणारे असल्याचे आढळून आले. त्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये आधारकार्ड आहे. आधारकार्ड हे पॅनकार्डशी लिंक असल्याने कर भरणारे लोक उघडकीस आले आहेत.

खात्याने तातडीने तहसील अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अशा लाभार्थ्यांना नोटीस बजावून जमा झालेली रक्कम वसूल करण्यास सांगितले आहे. अपात्र लाभार्थ्यांना जमा झालेली रक्कम धनादेश किंवा डीडी स्वरूपात तहसील कार्यालयात जमा करावी लागणार आहे. योजनेपासून अद्याप जे शेतकरी वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांनी अर्जासह आवश्‍यक कागदपत्रे ग्राहक सेवा केंद्रात जमा करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

कर भरणाऱ्या लोकांना योजना लागू होत नाही; तरीही अर्ज केल्याने ज्यांच्या खात्यांवर निधी जमा झाला आहे. आधारकार्ड पॅनकार्डला लिंक असल्याने चौकशीवेळी कर भरणारे लाभार्थी उघडकीस आले आहेत. जवळपास 319 अशा लाभार्थ्यांना जमा झालेली रक्कम परत करण्याची सूचना नोटिसीतून केली आहे. 
- नामदेव ईसळकर 
प्रभारी तहसीलदार, महागाव.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total 319 fake Beneficiaries are found in Kisan Sanman Yojna