esakal | ऊर्जा राज्यमंत्र्यांना दिली होती तगडी टक्कर, पण कॉंग्रेस नेत्यांनाच बसला धक्का 
sakal

बोलून बातमी शोधा

tough fight between madan yerrawar and balasaheb mangulkar this day

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत प्रत्येक फेरीत बाळासाहेबांची आघाडी कायम होती. शेवटच्या पाच फेऱ्या जिल्हावासीयांची उत्कंठा वाढवणाऱ्या ठरल्या. प्रत्येक फेरी कधी भाजपकडे तर कधी कॉंग्रेसकडे झुकत गेली

ऊर्जा राज्यमंत्र्यांना दिली होती तगडी टक्कर, पण कॉंग्रेस नेत्यांनाच बसला धक्का 

sakal_logo
By
अतुल मेहेरे

यवतमाळ ः आजपासून ठीक एक वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात कॉंग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला होता. याच दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर विजयाच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. 

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत प्रत्येक फेरीत बाळासाहेबांची आघाडी कायम होती. शेवटच्या पाच फेऱ्या जिल्हावासीयांची उत्कंठा वाढवणाऱ्या ठरल्या. प्रत्येक फेरी कधी भाजपकडे तर कधी कॉंग्रेसकडे झुकत गेली. शेवटी रात्री ८ वाजता भाजपचे उमेदवार मदन येरावार यांना विजयी घोषित करण्यात आले. या निकालाने बाळासाहेबांसह जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांना मोठा धक्का बसला. कार्यकर्ते तर अनेक महिने या धक्क्यातून सावरले नव्हते.

क्लिक करा - पारंपरिक चौकट मोडून वयाच्या सत्तावीसव्या वर्षी घेतील सर्जिकल उद्योगात भरारी; विदर्भातील पहिलीच युवती

तेव्हा ऊर्जा राज्यमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भाजपचे मदन येरावार या तगड्या उमेदवाराच्या समोर कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी तगडे आव्हान उभे केले होते. ज्याच्या त्याच्या मुखी बाळासाहेबांचेच नाव होते.

त्यांनी २५ वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हा परिषदेत नेतृत्व केले होते. उपाध्यक्ष आणि सभापती म्हणून कार्य करताना जिल्हाभर त्यांनी कार्यकर्ते जोडले आणि ते जिवापाड जपले. त्यामुळे यावेळी ते आमदार होणार, याची खात्री लहान मुले सुद्धा देत असत. पण त्यावेळी लागलेल्या त्या निकालाने कॉंग्रेस नेत्यांसह अनेकांना धक्का बसला. निकालाअंती येरावार यांना ८०४२५ मते मिळाली, तर मांगुळकर यांना ७८१७२ मते मिळाली. २२५३ मतांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचे तोंड बघावे लागले.

मांगुळकरांनी घेतली होती आघाडी

बाळासाहेब मांगुळकरांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी २०व्या फेरीपर्यंत कायम होती. पण त्यानंतर फरक दीड ते तीन हजारांवर आला होता. त्यानंतर फरक शेकड्यांवर आला आणि २५ व्या फेरीनंतर येरावारांनी आघाडी घेतली त्यानंतर मात्र येरावारांनी मांगुळकर यांना पुढे जाऊ दिले नाही. मतमोजणीच्या ३० फेऱ्या पूर्ण झाल्या, तेव्हा येरावारांनी २२५३ मतांची आघाडी घेतली होती. पोस्टल मतदानामध्ये ८७९ मते कॉंग्रेसला मिळाली, तर भाजपला ५०८ मते मिळाली.

सविस्तर वाचा - वर्दीवर लागले 'स्टार'; कडक वर्दीत पाहून बायको-मुलेही खुश, नवनियुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

दिली होती अभिनंदनाची जाहिरात

या निकालाचे वैशिष्य म्हणजे पराभूत उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी भाजपचे विजयी उमेदवार मदन येरावार यांना शुभेच्छा देणारी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली होती. त्यामध्ये त्यांनी मतदारांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचाही उल्लेख केला होता. या जाहिरातीची तेव्हा खूप चर्चा झाली होती. तेव्हा त्याच दिवशी जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी पराभूत उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले होते. प्रा. शिंदे यांनीही फेटा बांधून रोहित पवारांचा सत्कार केला होता. राज्यात या दोन घटनांची तेव्हा खूप चर्चा झाली होती.संपादन 

संपादन - अथर्व महांकाळ