esakal | माडगीच्या नृसिंह मंदिराची पर्यटक, भाविकांना ओढ, निसर्गरम्य परिसराला पर्यटन विकासाची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

भगवान नृसिंहाची आकर्षक मूर्ती.

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्‍यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला.

माडगीच्या नृसिंह मंदिराची पर्यटक, भाविकांना ओढ, निसर्गरम्य परिसराला पर्यटन विकासाची गरज

sakal_logo
By
रेवणनाथ गाढवे

देव्हाडा, (जि. भंडारा) : मोहाडी-तुमसर तालुक्‍याच्या सीमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या अथांग पात्रात वसलेले माडगी येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील रमणीय परिसर, हिरवळ, नदीची पार्श्‍वभूमी यामुळे येथे धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यास वाव आहे. परंतु, पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्‍यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे. भगवान नृसिंहाची जवळपास 32 मंदिरे महाराष्ट्रात आहेत. परंतु, बहुतेक ही सर्व मराठवाडा, खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रात आहेत.

जाणून घ्या : कोरोनामुक्त होऊनही करते ती लोकांच्या टोमण्यांचा सामना; कुटुंबालाही केले बहिष्कृत...
 
माडगी येथील हे नृसिंह मंदिर बहुधा विदर्भातील एकमेव असावे. जिल्ह्यात हे तीर्थक्षेत्र मिनी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. वैनगंगेच्या पात्रात कुशीत मोठ्या दगडांच्या टेकडीवर हे मंदिर आहे. येथील सिंदुरचर्चीत भव्य व तेजस्वी अशी भगवान नृसिंहाची स्वयंभू तेजस्वी मूर्ती भाविकांना आकर्षित करते.

मुख्य दरवाजातून सरळ आत गेल्यास एक हवनकुंड आहे. हवनकुंडाच्या बाजूने काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर मंदिर आहे. हे मंदिर तळघरासारखे भासते. तेथे दाराजवळ उजवीकडे हनुमंताची मूर्ती आहे. समोर नृसिंह भगवानाची पाच फूट उंच विशाल मूर्ती दिसते. जवळ खिडकीतून भगवंताच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडून ती अधिक विलोभनीय दिसते. याच मंदिरात गणपती, आदिशक्ती दुर्गा देवी, अन्नपूर्णा देवी यांच्या पुरातन मूर्ती आहेत.

यात्रेला दूरवरून भाविकांची हजेरी
याठिकाणी दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनंतर अमावास्येपासून 15 दिवसांची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरते. यात्रेला विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील हजारो भाविक हजेरी लावतात. वैनगंगेच्या निर्मळ , पवित्र पात्रात स्नान करून भाविक पूजा, अर्चना करतात. भजन, पूजन, गोपाळकाला असे आयोजन केले जाते. यात्रेत विविध प्रकारची दुकाने लावली जातात. नदीचे संपूर्ण पात्र, भाविकांच्या गर्दीने फुलून निघते.

अण्णाजी महाराजांचे वास्तव्य
राजयोगी अण्णाजी महाराज यांच्या वास्तव्याने हा परिसर पावन झाला आहे. आपल्या गुरूच्या आदेशाने महाराज 1928 साली नृसिंह टेकडीवर आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळीक होती. तुकडोजी महाराजांनीसुद्धा या स्थळी भेट दिली आहे. अण्णाजी महाराजांनी माडगी येथील नृसिंह टेकडीवर तपश्‍चर्या, उपासना, योगाभ्यास, ध्यान, साधना करून येथे येणाऱ्या भाविकांना आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला. महाराजांची मूर्तीसुद्धा परिसरात स्थापित केली आहे.
 

पर्यटनक्षेत्र असूनही दुर्लक्षित
नृसिंहमंदिर परिसर पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु अद्यापही या तीर्थक्षेत्राचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. आताही या तीर्थक्षेत्राला तुटपुंज्या विकासात समाधान मानावे लागत आहे. भविष्यात शासनाने या तीर्थक्षेत्रात सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधा व इतर कामे केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन तीर्थक्षेत्र व्यापकस्तरावर नावारूपाला येऊ शकेल.

loading image