वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात

अनिल कांबळे
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे अर्धेअधिक वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून ‘तंदुरुस्त पोलिस’ बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी योगदान देऊ शकेल.

नागपूर - शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे अर्धेअधिक वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून ‘तंदुरुस्त पोलिस’ बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी योगदान देऊ शकेल.

उपराजधानीत वेळी-अवेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह अन्य व्हीव्हीआयपींचा बंदोबस्त राहतो. भरउन्हात उभे राहून पोलिसांना कर्तव्य बजवावे लागते. शहरात जवळपास १३ ते १५ लाखांपर्यंत वाहने असून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहेत. वाहनामधून कार्बन डायऑक्‍साईड, मोनॉक्‍साईडसह अन्य विषाक्‍त असलेला धूर बाहेर पडतो. वाहतूक पोलिसांनी  १० ते १२ तास रस्त्यावर कर्तव्य बजवावे लागते. मोठ्याने वाजणारे हॉर्न, धुळीचे कण आणि वाहनांच्या  सान्निध्यात सतत राहिल्यामुळे धुरामुळे वाहतूक पोलिस कर्मचारी नकळत श्‍वसनाच्या आजाराने ग्रस्त होतो. मात्र, वेळेवर साप्ताहिक सुट्या मिळत नसल्यामुळे तसेच सुटीच्या दिवशी घरगुती कामांचा व्याप असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. पोलिस कर्मचारी डॉक्‍टरांकडे जाण्यासाठी टाळाटाळ करतो. त्यामुळे श्‍वसनाचे आजार मोठ्या दुखण्याकडे वाटचाल करतो. वाहतूक पोलिस दलातील अर्धेअधिक पोलिस कर्मचारी श्‍वसनाच्या आजाराने त्रस्त असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मास्क लावल्यास प्रतिबंध
चौकाचौकांत ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावल्यास श्‍वसनासाठी त्रास होणार नाही. उष्ण हवा आणि धूर यापासून बचाव होईल. परिणामतः आरोग्य सुदृढ राहील. उन्हाचाही त्रास कमी होऊन शरीराला त्रास होणार नाही. सध्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कुलिंग जॅकेट वाहतूक पोलिस वापरत असले तरी मास्कमुळे पूर्णतः सुरक्षा प्रदान होईल. 

धूलिकण आणि दुचाकीतून निघणारा विषारी धूर हा पर्यावरणच नव्हे तर मानवी शरीरासाठीसुद्धा घातक आहे. श्‍वसनक्रियेमार्फत धूलिकण फुप्फुसात शिरतात. फुप्फुसाची कार्यशक्‍ती कमी होते. दम्यासारखा आजार होतो. चौकातील फुलझाडेसुद्धा कोमेजलेली दिसतात किंवा काही दिवसांत सुकून जातात. पोलिस विभागाने यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा मानवी शरीर निरोगी ठेवणे शक्‍य नाही. 
- डॉ. अशोक अरबट, श्‍वसनरोगतज्ज्ञ

Web Title: Traffic police respiratory illness