वाहतूक बंद केली, पण जनजागृती कोण करणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नागपूर : अजनी रेल्वे पूल जीर्ण झाल्याने पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, शुक्रवारी पहिल्याच दिवशी सकाळी तसेच सायंकाळी पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जड वाहतूक बंद करण्यात आली; मात्र जनजागृतीचे फलक न लावल्याने जड वाहनेही पुलाकडे आल्याने ही कोंडी झाली. 

नागपूर : अजनी रेल्वे पूल जीर्ण झाल्याने पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, शुक्रवारी पहिल्याच दिवशी सकाळी तसेच सायंकाळी पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जड वाहतूक बंद करण्यात आली; मात्र जनजागृतीचे फलक न लावल्याने जड वाहनेही पुलाकडे आल्याने ही कोंडी झाली. 
अजनी रेल्वे पूल दक्षिण आणि पश्‍चिम नागपूरला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ब्रिटिशकालीन हा पूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला गुरुवारी लोखंडी खांब उभे करण्यात आले. केवळ कार व दुचाकी जाऊ शकतील, अशा पद्धतीने खांब उभे करण्यात आले. परंतु, याबाबत कुठलेही फलक न लावल्याने जड वाहनधारकांनीही या रस्त्याने वाहने वळविली. मात्र, पुलावरून जड वाहने जाऊ शकत नसल्याचे लक्षात आले. मात्र, मागे कारच्या रांगा व पुढे खांब असल्याने ट्रकचालकाचीही कसरत झाली. सायंकाळी दोन्ही बाजूने हीच स्थिती होती. त्यातच पुलावर दुभाजक लावणारे वाहन उभे असल्याने कार व दुचाकी चालकांची चांगलीच कोंडी झाली. 
ट्रक अडकल्याने कारचालकांना पुढे जाता येत नव्हते. दुचाकीधारकांनाही पुढे जाणे कठीण झाले होते. परिणामी सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत अजनी पुलावर चांगलीच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांना दिशानिर्देश देण्यात येत होते. परंतु, यात दुचाकीधारकांनाही चांगलाच त्रास सहन करावा लागला. अनेकांनी ही कोंडी बघून मागे परतण्याचा प्रयत्न केला. परंतु, कारच्या रांगामुळे त्यांना बाहेरही पडता येत नव्हते व पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुलावर खांब लावले की कोंडी करण्यासाठी, असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. 
लवकरच पुलाची तपासणी 
व्हीएनआयटीने पुलाचे परीक्षण करून रेल्वेला अहवाल दिला आहे. यात पुलाचे सर्फेसिंग करणे अत्यावश्‍यक असल्याचे म्हटले आहे. शिवाय पुलावर अवजड वाहनांना बंदी घालावी. पुलाचे जोडभाग तपासून बघण्याचीही शिफारस केली आहे. यानुसार रेल्वे प्रशासन आणि नागपूर महापालिका पुलाचे लवकरच निरीक्षण करणार आहे. पुलाच्या जोड भागात काही त्रुटी आढळल्यास आठ दिवसांमध्ये त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic stopped, but who will raise awareness?