ट्रॅफिक पोलिसांची एकाच जागी वर्षानुवर्षे ड्युटी

file photo
file photo

नागपूर : वाहतूक शाखेत असलेल्या विविध वाहनांवर तसेच विशेष चौकात वर्षानुवर्षे "तेच ते' कर्मचारी ड्युटीवर आहेत. त्यांची ड्युटी अन्यत्र कुठेही लावण्यात येत नाही. त्यामुळे शहर वाहतूक पोलिस दलात खदखद व्यक्‍त केल्या जात आहे.
शहर वाहतूक पोलिस दलातील सकारात्मक भूमिका घेत पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांनी अनेक बदल केले आहेत. त्यांच्या अभियानामुळे शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था ताळ्यावर येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आतापर्यंत मलिन झालेली वाहतूक पोलिस विभागाची प्रतिमा सुधारत आहे. मात्र, काही "खास' असलेले पोलिस कर्मचारी उपायुक्‍तांची दिशाभूल करून आपला "स्वार्थ' आणि "अर्थ' साध्य करीत असल्याची चर्चा आहे. शहरातील वाहतुकीच्या सात झोनमध्ये 14 ते 18 वाहतूक वाहने आहेत. यामध्ये टोईंग व्हॅन, लिफ्टिंग व्हॅन आणि अन्य वाहनांवर असलेले पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे तेथेच कार्यरत आहेत. एकाच जागेवर काम करीत असल्यामुळे "सेटिंग' करण्यावर भर दिला जातो. अनेक टोईंग व्हॅनमधील कर्मचारी कारला जॅमर लावल्यानंतर पावतीऐवजी थेट पैशाची मागणी करीत असल्याची चर्चा आहे. तसेच दुचाकी उचलणाऱ्या वाहनातील पोलिस कर्मचारी पैसे घेऊन रस्त्यावरच दुचाकी सोडून देत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे खाऊगिरी वृत्ती वाहतूक पोलिस दलात बळावल्याची चर्चा आहे.  
फिक्‍स पॉइंटवरही तोच प्रकार
शहरातील व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, संविधान चौक, महाल, इंदोरा चौक, सक्‍करदरा चौक, अजनी चौक, तुकडोजी चौक, मेडिकल चौक अशा चौकात वर्षानुवर्षे "खास' असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार लावण्यात येते. यामध्ये "थ्री स्टार' आणि ड्युटी रायटरचा "मलिदा' सेट केलेला असतो. त्यामुळे कोणते पॉइंट कुणाला द्यावे, याचा हिशेबही सायंकाळी होत असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com