अधिवेशनादरम्यान कृषी विभागात बदल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नागपूर - हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोचल्याने ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली, ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

नागपूर - हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोचल्याने ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली, ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

प्रशासकीय बदल्या दरवर्षी मार्च-एप्रिलदरम्यान होतात; मात्र यंदा हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधत कृषी विभागातील 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. कृषी विभागात अचानक झालेल्या या परिवर्तनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बदल्यांची कुणकुण लागल्याने यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित येत निर्णयाविरोधात बैठक घेतल्याची माहिती आहे. राज्यात प्रशासकीय बदल्यांचा कालावधी मार्च-एप्रिल असा आहे. इतर वेळी होणाऱ्या बदल्या या विनंती बदल्या म्हणून गणल्या जातात; मात्र कृषी खाते या नियमांना अपवाद ठरले.
नागपूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांची नागपूर येथे उपसंचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आत्मा प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे यांची बदली झाली आहे. भंडाऱ्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नलिनी भोयर यांची नागपूर आत्मा प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. यवतमाळचे आत्मा प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांची गोंदिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी बदली झाली आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी विनंती अर्ज केले नसतानाही त्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

Web Title: Transfer Session of Agriculture Department