संत्रानगरी अनुभवणार चारमजली पुलावरून प्रवास; महामेट्रोच्या 573 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

संत्रानगरी अनुभवणार चारमजली पुलावरून प्रवास; महामेट्रोच्या 573 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

नागपूर : शहरातील वाहतूक अत्याधुनिक होणार असून कामठी मार्गावरील महामेट्रोच्या चार मजली उड्डाणपुलाला "एनएचएआय'ने मंजुरी दिली. त्यामुळे आता नागपूरकरांना चार मजली पुलावरून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहेच, शिवाय देशातील हा पहिलाच पूल असल्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीही पर्वणी ठरणार आहे. महामेट्रोने 573 कोटींचा प्रस्ताव एनएचएआयकडे पाठविला होता. या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. 
महामेट्रोने आतापर्यंत सर्वच स्टेशनची कामे अत्याधुनिक व आकर्षक केली आहे. आता सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनदरम्यान एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत वाहतुकीसाठी चार मजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी सुमारे 5.3 किमी आहे. वाराणसी आणि हैदराबाद या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या मार्गावरून दररोज असंख्य वाहने जात असतात. मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थाने, व्यावसायिक ठिकाणे, सिनेमा हॉल, मॉल्स या भागात आहेत. त्यामुळे भविष्यात कामठी मार्गावरील या उड्डाणपुलामुळे वाहतूक सहज व आरामदायी होणार आहे. याशिवाय चार मजली उड्डाणपूल देशातील एकमेव असल्याने देशभरात नागपूरचे आकर्षण आणखी वाढणार आहे. गड्डीगोदाम परिसरातील "गुरुद्वारा'जवळ वाहनांसाठीचा उड्डाणपूल आणि मेट्रो व्हायाडक्‍टची सर्वाधिक उंची अनुक्रमे 14.9 मीटर 24.8 मीटर आहे. मेट्रोसाठीच उभारण्यात येणाऱ्या पिलरवर पुलाचा डोलारा राहणार आहे. त्यामुळे खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे महामेट्रो प्रशासनाने नमूद केले. कामठी मार्गावर सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, या उड्डानपुलाच्या मंजुरीला एनएचएआयने रोखून धरले होते. याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. महामेट्रो प्रशासनानेही या पुलाच्या मंजुरीसाठी एनएचएआयकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com