एसटी, रेल्वेचा प्रवास नको रे बाप्पा; उष्णतेमुळे प्रवास झाला कष्टदायक

विवेक मेतकर
सोमवार, 30 एप्रिल 2018

रेल्वेचे आरक्षणही काही महिन्यांपूर्वीच फुल्ल असल्याने जागा मिळत नाही. अकोला रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीमुळे खचाखच भरून आहेत.

अकोला - या आठवड्यात सरकारी चारमान्यांना सलग चार दिवस सुट्या आहेत. लग्नसमारंभासाठी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे, बसगाड्या हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आज दिसून आले. उन्हाळा सुरू झाला असून, बहुतांश शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे घरातील मुले आजोळी निघाली. त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील सुध्दा सुट्यांची पर्वणी साधून प्रवासाला बाहेर पडल्याने बस व रेल्वेस्थानकावर आज (ता. 30) प्रवाशांची मोठ्या संख्येने झुंबड उडाली आहे.

असह्य हा उकाडा -
उन्हाचा पारा 44 अंशावर पोहोजला. त्यामुळे घरी दुचाकी असूनही बहुतांश नागरिक प्रवास करण्यासाठी बस व रेल्वेगाड्यांचा आधार घेतात. इतर वाहनांच्या तुलनेत हा प्रवास सुखकर व सुरक्षित मानला जाते. परंतु, प्रवाशांची गर्दी, उकाडा व उष्णतेमुळे होणारे हाल पाहून हा प्रवास नको रे बाप्पा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली दिसते. पर्याय नसल्याने त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी या साधनांचा आधार घ्यावाच लागतो.

सलग सुट्यांचा परीणाम -
या आठवड्यात चौथा शनिवार, रविवार, सोमवार बुध्द जयंती व मंगळवारी महाराष्ट्र दिन असल्याने सलग सुट्याची भेट सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. जिल्हा परिषद, सीबीएसई शाळांच्या परीक्षा आटोपल्या असून त्यांना सुट्या लागल्या आहेत. सुट्यामध्ये लहान मुलांना आजोळी, मामाच्या गावी जाण्याचे आकर्षण असते. सध्या लग्नसराईचा हंगामही सुरू आहे. सुट्यामंध्ये विवाहमुहूर्तही आहेत. चांगला सुवर्णयोग जुळून आल्याने अनेकजण सहकुटुंब बाहेरगावी निघाल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे विरंगुळा म्हणून थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठीही अनेकजण रवाना झाले आहेत. लग्नसराईच्या व सुट्यांच्या काळात बस व रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी असते. 

रेल्वेस्थानाकावर रांगा -
रेल्वेचे आरक्षणही काही महिन्यांपूर्वीच फुल्ल असल्याने जागा मिळत नाही. अकोला रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीमुळे खचाखच भरून आहेत. रेल्वेने प्रवास हा कमी पैशात होत असल्याने त्यात प्रवाशांची भर अधिक असते. तिकिट काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आल्या. 

बसस्थानाकवर प्रचंड गर्दी -
बसस्थानकावरील परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नव्हती. बस फलाटावर येताच बसच्या प्रतिक्षेत असणारे प्रवासी जागा मिळविण्यासाठी अक्षरशः तुटून पडतात. दुपट्टा, बॅग अशा वस्तू खिडकितून टाकून जागा बुकिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रसंगी प्रवाशांमध्ये हमरीतुमरी होण्याचे प्रसंग ओढवताना दिसतात. अाधीच उकाडा त्यात बसमधील गर्दीमुळे अंगातून बाहणाऱ्या घामाच्या धारांमुळे प्रवासी हैराण झाल्याचे दिसून आले.

मोजक्याच बस फेऱ्या -
ग्रामीण भागात जाण्यासाठी काही मोजक्याच बसफेऱ्या उपलब्ध आहेत. या गर्दीमुळे जागा न मिळाल्याने यावेळेत न पोहोचल्याने अनेकांना बसने प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळेप्रवास करण्यासाठी खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. खासगी प्रवासी गाड्यांमध्ये तर प्रवासी कोंबून भरले जातात. चालक त्याचा कोटा पूर्ण होईपर्यंत गाडी सोडत नाही. प्रवाशांची गर्दी पाहून त्यांनी सुध्दा प्रवासाचे दर वाढविले आहेत. परंतु, दुसरे साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीण प्रवाशांना नाइलाजाने या खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Travelling in summer by Public transport is very difficult