जीर्ण झाड कोसळून सहा महिला जखमी

विशाल म्हस्के
सोमवार, 23 जुलै 2018

महिला शेतमजूर शेतात कामासाठी जात असताना रस्त्यालगतचे जीर्ण झालेले चिंचेचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात पाच महिला गंभीर जखमी झाल्या.

विडूळ (जि. यवतमाळ) : येथील पाच महिला शेतमजूर शेतात कामासाठी जात असताना रस्त्यालगतचे जीर्ण झालेले चिंचेचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात पाच महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज सोमवारी (ता. 23) सकाळी दहाच्या सुमारास येथील बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर झाली.

या घटनेत जखमी झालेल्यामध्ये लक्ष्मी शिवाजी आलमे, संध्या संजय बिचेवार, सीमा नीलेश बीचेवार, रेणुका श्याम बिचेवार, मंगल परमेश्वर बिचेवार, सुरेखा रामेश्वर बिचेवार यांचा समावेश आहे. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

झाड कोसळल्याची बातमी गावात समजताच गावचे पोलिस पाटील गजानन मुलंगे, मिलिंद धुळे, पंजाबराव भालेराव, अनिल कांबळे, नीलेश बोनसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ताबडतोब रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली व विस्कळित झालेली वाहतूक पूर्ववत सुरू करून झाड हटविले. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाला. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -
स्थानिक ग्रामस्थ्यांच्या सांगण्यावरून असे लक्षात येते की, या मार्गावर अनेक  जीर्ण धोकादायक मोठाले झाडे रस्त्याच्या कडेला आहेत. ती कधी कोसळतील, याचा नेमच नाही. परंतु, तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत दुर्लक्षच करण्यात आल्याने ही घटना घडली. म्हणून ही सर्व जीर्ण झाडे त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The tree collapses on three womens womens injured