पंतप्रधानांच्या मार्गावरील झाडांच्या फांद्यावर कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर काम करीत असतानाच महापालिका प्रशासनानेही कंबर कसली आहे. पंतप्रधान विमानतळावरून थेट कोराडीला जाणार असल्याने या मार्गावरील झाडांच्या फांद्या कापण्यात येणार आहे. विशेष म्हणजे झाडे लावण्यासाठी जनजागृती करणारी महापालिकाच झाडांवर कुऱ्हाड चालविणार आहे.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर काम करीत असतानाच महापालिका प्रशासनानेही कंबर कसली आहे. पंतप्रधान विमानतळावरून थेट कोराडीला जाणार असल्याने या मार्गावरील झाडांच्या फांद्या कापण्यात येणार आहे. विशेष म्हणजे झाडे लावण्यासाठी जनजागृती करणारी महापालिकाच झाडांवर कुऱ्हाड चालविणार आहे.

पंतप्रधान 14 एप्रिलला शहरात येत आहेत. दौऱ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी उपायुक्त, सहायक आयुक्त व विभागप्रमुखांची सोमवारी बैठक घेतली. पंतप्रधान दीक्षाभूमीवर जाणार असल्यामुळे या रस्त्यांची पाहणी करून आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश कुंभारे यांनी दिले. कृपलानी टर्निंग ते माता कचेरी चौक व पुढे लक्ष्मीनगर चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असून, डांबरी रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू आहे.

परंतु, या डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, खड्डे ताबडतोब बुजवून रस्ता समतोल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विमानतळ ते कोराडी वीज केंद्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. मनपाच्या अधीन येणाऱ्या आरबीआय चौक-कन्नमवार चौक-आकाशवाणी चौक, जी.पी.ओ चौक-लेडीज क्‍लब चौक, वनिता विकास चौक, जपानी गार्डन चौक, राजभवन रिअरगेट, जुना काटोल नाका चौक, पोलिस तलाव टी-पॉइंट, पागलखाना चौक परत राजभवन या रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करा, विमानतळ ते कोराडी वीज केंद्र मार्गाच्या दोन्ही बाजूंनी झाडांच्या फांद्यांनी फुटपाथ व रस्त्याचा व्यापला आहे. त्यामुळे या मार्गावरील झाडांच्या फांद्या कापून रस्तादेखील मोकळा करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

क्रीडासंकुलाच्या पश्‍चिमेस पार्किंग
पंतप्रधानांचा प्रमुख कार्यक्रम मानकापूर येथील क्रीडासंकुलात आहे. कार्यक्रमास जवळपास 25 हजार नागरिक येणार असून, हजारावर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतील. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी क्रीडासंकुलाच्या पश्‍चिमेस जागा आरक्षित केली आहे. या मैदानावरील खड्डे बुजविण्याच्या तसेच अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही कुंभारे यांनी दिल्या.

Web Title: tree cutting on road