मेळघाटातील आदिवासींच्या नशिबात शुद्ध पाणीही नाही, आजार वाढताहेत...

melghat
melghat

अचलपूर (जि. अमरावती) : उन्हाळा सुरू होताच मेळघाटातील बहुतांश गावांत पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. परिणामी नागरिकांचे दूषित पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मेळघाटात जलजन्य आजार डोके वर काढत आहेत. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर अशा जलजन्य आजारांना आळा बसविला जाऊ शकतो, पण त्यासाठी प्रशासनाने वेळीच टॅंकरने शुद्ध पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. 

चिखलदरा तालुक्‍यातील टेंब्रूसोंडा सर्कलमधील बहुतेक गावांमध्ये जलसंकटासोबतच जलजन्य आजारांची सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. आदिवासी बांधव दूषित पाणी पीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. परिणामी जलजन्य आजार पसरण्याला सुरुवात झाली आहे. टेंब्रूसोंडा सर्कलमधील सोनापूर, एकझिरा, रुईफाटा या गावांमध्ये जलजन्य आजारासह ताप, उल्टीच्या रुग्णांची संख्या 20 च्या वर असल्याची माहिती टेंब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्राकडून मिळाली आहे. असे असतानासुद्धा प्रशासन सुस्त दिसत आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी सोनापूर गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली होती. ती आरोग्य विभागामुळे आटोक्‍यात आली. यावर्षीसुद्धा सोनापूर गावात अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तरीसुद्धा या गावापासून कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यातील अनेक गावांत जलसंकट निर्माण होऊनही प्रशासनाने अद्यापही ठोस पाऊल उचलले नाही. परिणामी मेळघाटात जलसंकटासोबतच जलजन्य आजाराचा भडका उडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

पाण्याचा प्रश्‍न गंभीर 
मेळघाटात चिखलदरा व धारणी या दोन तालुक्‍यांचा समावेश होतो. दऱ्या-खोऱ्यांमध्ये अनेक लहान-लहान गावांचा अंतर्भाव आहे. काही गावे अतिशय दुर्गम असल्याने त्याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांचीसुद्धा कमतरता आहे. काही गावांत अद्याप वीजदेखील पोहोचलेली नाही. डोंगराळ भागामुळे पाण्याचे कायमस्वरूपी नियोजन येथे झालेले नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न मेळघाटच्या नागरिकांच्या पाचवीला पुजला आहे. 

कुपोषणाचा कलंक 
मेळघाटचे नाव घेतले तर कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू डोळ्यांसमोर येतात. या भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा अभाव हे कुपोषणाच्या विविध कारणांपैकी एक आहे. असे असतानाही पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने आजवर पाहिजे तसे प्रयत्न झालेले नाहीत. 

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सोनापूर, एकझिरा, रुईफाटा या गावांत जवळपास 20 च्या वर रुग्ण शौच, उल्टी, तापाचे आढळून आले. त्यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित गावात लवकरच टॅंकर सुरू करण्यात येणार आहे. 
-डॉ. चंदन पिंपळकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र टेंब्रूसोंडा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com