रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tribal Migration for employment

रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर

चिखलदरा : मेळघाटात सध्या रोजगाराची कामे नसल्याने येथील आदिवासी कामाच्या शोधात मेळघाटबाहेर स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गावे रिकामी होत असल्याने शाळासुद्धा ओसाड पडण्याचा धोका आहे.

मेळघाटात सद्यःस्थितीत शेतीची कामे संपली आहेत. अशा परिस्थितीत स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसल्याने आदिवासी स्थलांतर करीत आहेत. सोयाबीन कापण्यासाठी मजुरांचे स्थलांतर होत आहे, तर दुसरीकडे स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. हे मजूर अमरावती, अकोला, दर्यापूरसह महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या विविध भागात रोजगाराच्या शोधात जात आहेत.

त्यांच्यासोबत शाळकरी मुलेसुद्धा असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. सोबतच स्थलांतरित कुटुंबांच्या आरोग्याचा व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुद्धा आहे. त्यामुळे शासनाने रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी होत आहे. मेळघाटातील मजूर सोयाबीनच्या कापणीपासून तर हरभऱ्याच्या कापणीपर्यंत मेळघाटबाहेर स्थलांतरित होतात. चिखलदरा तालुक्यात २१८ शाळा असून २३ हजारांच्या जवळपास विद्यार्थी आहेत. यातील किती विद्यार्थी स्थलांतरित झाले, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.

...तर स्थलांतर थांबणार

पथ्रोट गावानजीकच्या कुंभी वाघोलीमधील सीताफळ वन यावर्षी चांगलेच बहरल्याने वनहक्क समितीच्या सदस्यांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. स्थलांतर थांबण्याच्या दृष्टीने हा उत्तम पर्याय असल्याने अशाप्रकारचे प्रयोग संपूर्ण मेळघाटात होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शेतीची कामे नसल्याने दैनंदिन जीवनाच्या गरजा भागविण्यासाठी त्यांना शहरी भागात जावे लागत आहे. परिणामी त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने मजुरांना गावातच काम उपलब्ध करून द्यावे.

- नरेंद्र टाले, शेतकरी

चिखलदरा तालुक्यातील किती कुटुंबे रोजगारासाठी बाहेर गेली, सोबत किती मुले आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे केंद्रप्रमुखांना सांगितले आहे. या कुटुंबांची माहिती घेऊन सर्व्हे झाल्यानंतर शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल. शासनाच्या आदेशानुसार स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्यात येईल.

-अरुण शेगोकार, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा.