पाचव्या पतीला मागितली 50 लाखांची खंडणी

file photo
file photo

नागपूर : बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या पतीला ब्लॅकमेल करून 50 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शिक्षक महिला व तिच्या सहकाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समीरा फातेमा मुख्तार अहमद (35, रा. कामठी) आणि आनंद पवार अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मो. तारिक अनीस अहमद (34, रचना वृंदावन, मानकापूर) हे रामदासपेठ येथील एका बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मो. तारिक यांचे पहिले लग्न 28 मे 2014 रोजी औरंगाबाद येथील एका तरुणीशी झाले होते. काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी शादी डॉट कॉम या वेबसाइटवर आपली प्रोफाइल टाकली. 7 सप्टेंबर 2018 रोजी समीराने मो. तारिक यांना फोन करून सांगितले, "तुमची प्रोफाइल वाचली. मला तुमच्याशी दुसरे लग्न करायचे आहे.' त्यावर त्यांनी पहिल्या पत्नीची माहिती तिला दिली. त्यावरही समीराने मो. तारिकसोबत दुसरे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
2 ऑक्‍टोबर 2018 रोजी मो. तारिक आणि समीरा यांची भेट झाली. तिने ती मोमीनपुरा येथील एका शाळेत शिक्षिका आहे, तिचेही पहिले लग्न झाले असून हे दुसरे लग्न असल्याचे सांगितले. डिसेंबर 2018 मध्ये तिची कोंढाळी येथे बदली झाली असून बदली रोखण्यासाठी प्राचार्यांशी भेट घेण्यास सांगितले. मो. तारिक हे समीरासोबत शाळेत गेले आणि प्राचार्यांची भेट घेतली. त्यावर प्राचार्यांनी समीराला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावरून समीराने प्राचार्यांच्या विरोधात तहसील पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी समीराचे पती म्हणून मो. तारिकचे बयाण नोंदविले. त्यानंतर काही दिवसांनी समीराने लग्न न केल्यास बॅंकेत जाऊन तमाशा करेन असे सांगितले, तसेच लग्नासाठी तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे मो. तारिक घाबरले आणि 24 फेब्रुवारी 2019 रोजी मो. तारिक यांनी निकाहनाम्यावर सही केली.
पोलिस असल्याची बतावणी
आरोपी आनंद पवार याचे समीराशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पवार हा तोतया पोलिस असून मानकापूर ठाण्यात अधिकारी असल्याची बतावणी तारिकला करायचा. त्याने पोलिस खात्याचे बनावट आयकार्डही बनवले होते. पोलिसांची काठीही घरात ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खून करण्याची धमकी
25 एप्रिल रोजी समीराने तारिकला कामठी येथे समझोता करण्यासाठी बोलविले आणि घटस्फोट देण्यासाठी 50 लाख रुपये आणि घर घेऊन देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास खून करण्याची धमकी दिली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून मो. तारिक यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी समीरा आणि आनंद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
"और कितनी शादीयॉं करेगी'
समीराच्या मोबाईलवर वेळोवेळी अनेक फोन येत असल्याचे मो. तारिकच्या लक्षात आले होते. त्याचवेळी वेळोवेळी ती आत्महत्या करण्याचीही धमकी देत होती. त्यामुळे मो. तारिक यांचा तिच्यावरचा संशय बळावला. तिच्या मोबाईलची तपासणी केली असता "तू और कितनी शादीया करेगी' असा मॅसेज होता. आलेल्या फोनवरून मो. तारिक यांनी संपर्क केला असता समीराचे यापूर्वी चार लग्न झाल्याचे तारिकच्या लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com