पाणीटंचाईचे वास्तव लपविण्याचा प्रयत्न 

राजेश प्रायकर 
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाची दाहकता वाढली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह तसेच नवेगाव खैरी येथील जलाशयांनी पंधरा दिवसांपूर्वीच तळ गाठला. परिणामी शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

नागपूर - उन्हाची दाहकता वाढली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह तसेच नवेगाव खैरी येथील जलाशयांनी पंधरा दिवसांपूर्वीच तळ गाठला. परिणामी शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यातही अशीच स्थिती असून, गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील धरणांतील पाण्याची स्थिती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत नाही. त्यामुळे पाणीटंचाईवरून निर्माण होणारा रोष टाळण्यासाठी पाणीटंचाईचे वास्तव लपविण्याचा प्रकार जलसंपदा विभागाकडून होत असल्याचे चित्र आहे. 

उन्हाळा लागताच नागपूर महापालिकाच नव्हे तर राज्यातील इतर महापालिका, नगर परिषदाही शहराची तहान भागविणाऱ्या धरणातील पाण्यावर नजर ठेवतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य  संस्थांना पाण्याची कपात, पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मदत होते. परंतु, जलसंपदा विभागाने २८ मार्चनंतर राज्यातील जलसाठ्याची स्थिती संकतेस्थळावर अद्ययावत केली  नसल्याचे आज दिसून आले. नागपूर शहराची तहान भागविणारी जलाशये कोरडी आहेत.  जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळानुसार २८ मार्चला तोतलाडोह जलाशयात केवळ ५.३८ टक्के पाणी शिल्लक आहे. 

त्यापूर्वी २२ मार्चला या जलाशयात ५.९७ टक्के पाणीसाठा होता. अर्थात आठवडाभरात या जलाशयातील पाण्यात ०.५९ टक्के घट झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून जलसंपदा विभागाने संकेतस्थळावर धरणे, जलाशयातील पाण्याची माहिती अद्ययावत केलेली  नाही. त्यामुळे आजची नेमकी स्थिती काय? हा प्रश्‍न अनुत्तरित असून, यात आणखी घट  झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशीच स्थिती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी येथील जलाशयाचीही आहे. 

२८ मार्च रोजी या जलाशयात ३०.४३ टक्के पाण्याची नोंद केली होती. २२ मार्चला या जलाशयात ३१.८ टक्के पाणी होते. या जलाशयातील पाण्यातही घट  झाली. परिणामी शहरावर पाणीटंचाईचे संकट आणखी तीव्र झाले आहे. मात्र, पाणीटंचाई लपविण्याचा प्रकार राज्य सरकारकडून सुरू असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार 
मनपाकडून दरवर्षी विहिरींची स्वच्छता, बोअरवेल दुरुस्तीची कामे मार्च-एप्रिलमध्येच करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. नळातून पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या भागात आता महापालिकेने विहिरींची स्वच्छता, बोअरवेल दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. नळ नसलेल्या भागात ३४७ बोअरवेलचे खोदकामही सुरू करण्यात आले. आतापर्यंत केवळ शंभर बोअरवेल खोदून झाल्या. सध्या अस्तित्वात असलेल्या ५२५४ बोअरवेलची दुरुस्ती करण्याचे कामही आता सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत उन्हाळा निघून जाण्याची शक्‍यता असून, नागरिकांना बोअरवेलचे पाणी कधी मिळणार? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Trying to hide the reality of Water scarcity