...या जिल्ह्यातील एकही बाजार समितीत खरेदी करत नाही हे पीक; म्हणून शेतकरी अडचणीत

पी. डी. पाटील
Sunday, 3 May 2020

तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून कापूस या पिकाला पर्याय म्हणून हळद या नगदी पिकांकडे वळला आहे.

रिसोड (जि.वाशीम) : लॉकडाउनच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत शेतकऱ्यांनी हळद तयार केली. परंतु जिल्ह्यात एकाही बाजार समितीत हळद खरेदी केल्या जात नसल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिसोड बाजार समितीने हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.

तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून कापूस या पिकाला पर्याय म्हणून हळद या नगदी पिकांकडे वळला आहे. हळद हे पीक भरघोष व हमखास उत्पादन देणारे पीक असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात आहे. काढणीच्या ऐन कोरोना आजार वाढल्यामुळे हंगामात संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. मजूर मिळणे कठीण झाले. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत तसेच आवश्यक त्या उपाययोजना करून हळद तयार केली. 

आवश्‍यक वाचा - बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे

काही शेतकऱ्यांची तर मार्च मध्येच हळद तयार झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. सर्वच शेतमालाच्या भावात मोठी घसरण झाली. खरीप हंगाम केवळ एका महिन्यावर येवून ठेपला आहे. लॉकडाऊनचा कालावधीही वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक हळद तयार होऊन घरात पडले आहे. रिसोड, वाशीम व मालेगाव बाजार समित्यामध्ये हळद खरेदी केल्या जात होती. परंतु या वर्षीच्या हंगामात हळद खरेदीला सुरुवात झाली नाही. निर्धारित वेळेत व आवश्यक त्या उपाययोजना करून इतर मालाची खरेदी नियमित सुरू आहे.

हेही वाचा - ‘त्यांनी’ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा मी राजकीय सन्यास घेईन! कोण म्हणाले पहा!

हळद साठवणूक करण्यात योग्य नसल्यामुळे शेतकरी काढणीनंतर तसेच हळद विक्री करतात. परंतु यावर्षी खरेदी सुरू नसल्यामुळे हळद शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खरिपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिसोड बाजार समितीने हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.

येत्या आठवड्यात हळद खरेदीचा निर्णय
हळद खरेदी करणारे व्यापारी हे बाहेरच्या जिल्ह्यात असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून लवकरच संचालकांची सभा घेण्याचे घेण्याचे ठरले आहे. येत्या आठवड्यात हळद खरेदीला निर्णय घेतल्या जाईल.
- विजयराव देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turmeric growers in trouble in washim district