esakal | पोलिस महासंचालकांचे ‘पुंडकर हत्याकांड’कडे लक्ष; प्रकरण समांतर तपास पथकाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

AKO20A65120.jpg

आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळे पथके तयार करण्यात आले असून, लवकरच मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिस महासंचालकांचे ‘पुंडकर हत्याकांड’कडे लक्ष; प्रकरण समांतर तपास पथकाकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री अकोटात गोळीबार झाला होता. जखमी अवस्थेतील पुंडकर यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात भरती केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण अकोला पोलिस विभागाने गांभीर्याने घेतले आहे. अश्‍यातच पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाचा तपास समांतर तपास पथकाकडे दिला असून, या पथकामध्ये अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विश्‍वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञांत हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता दरम्यान गोळीबार केला. या हल्ल्याचे वृत्त जिल्हाभर वाऱ्यासारखे पसरताच अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्यासोबत पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी रात्री उशिरा दरम्यान घटनास्थळाला भेट दिली. यावेळी आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळे पथके तयार करण्यात आले असून, लवकरच मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी - ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांचा मृत्यू; रात्री अकोटात झाला होता गोळीबार

आरोपींच्या मागावर सहा पथके
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी मारेकऱ्यांच्या शोधार्थ सहा पथके तयार केली आहेत. ही पथके जिल्ह्यातील विविध भागात पाठविण्यात आली असून, जिल्ह्या लगतच्या राज्यातही पोलिस जाण्याची शक्यता आहे.

समांतर तपास पथकात कुशल अधिकारी
तुषार पुंडकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी समांतर तपास पथक गठीत केले आहे. या पथकामध्ये अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर हे पथक आपल्या पद्धतीने तपास करीत आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक घटनास्थळी
तुषार पुंडकर यांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी अकोट-तेल्हारा शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अकोटात अतिरीक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर शनिवारी रात्री अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला.