चोवीस तासांत मिळणार रक्‍कम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नागपूर - सद्य:स्थितीत ऑनलाइन खरेदीकडे सर्वांचाच कल वाढला असून, यातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. परंतु ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार २४ तासांत सायबर क्राइम सेलकडे केल्यास तक्रारकर्त्याला १०० टक्के रक्कम मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही सायबर क्राइमचे पोलिस उपनिरीक्षक विशाल माने यांनी दिली.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अ. भा. ग्राहक पंचायतने रामदासपेठ येथील कार्यालयात ‘सायबर क्राइम’वर घेण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर अ. भा. ग्राहक पंचायतचे माजी राष्ट्रीय सचिव अशोक त्रिवेदी, विदर्भ प्रांताध्यक्ष गजानन पांडे, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) अशपाक शेख, जिल्हा संघटनमंत्री गणेश शिरोळे उपस्थित होते. माने म्हणाले, ई-मेल, पासवर्ड हॅक करणे, क्रेडिट, डेबिट कार्डवर चीप नसेल तर ते कार्ड सुरक्षित नाही. त्यामुळे नागरिकांनी चीप असलेल्या कार्डची बॅंकांना त्वरित मागणी करावी. फोनवर येणाऱ्या ‘कॉल’वरील आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. फेसबुक आदी सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नये, मुले मोबाईल, संगणकावर कोणते संकेतस्थळ पाहतात, याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करीत त्यांनी सायबर क्राइमचा ८३२९६९९१३४ हा टोल फ्री क्रमांक सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये नोंद करून ठेवावा, असेही माने म्हणाले. सहायक पोलिस आयुक्त अशपाक शेख यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत हेल्मेटशिवाय दुचाकी व सीटबेल्टशिवाय चारचाकी वाहन चालवू नये असे आवाहन केले. 

आय. टी. सेल प्रमुख नरेंद्र कुळकर्णी यांनी प्रास्ताविक तर संचालन महिला आघाडी प्रमुख तृप्ती आकांत यांनी केले. आभार ॲड. स्मिता देशपांडे यांनी मानले. यावेळी विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख विनोद देशमुख यांचेही भाषण झाले. आयोजनासाठी श्रीपाद हरदास, श्रीपाद भट्टलवार, उदय दिवे, राजू पुसदेकर, ज्ञानेश्‍वर चौधरी, सतीश शर्मा, चंद्रशेखर ढवळे, अमर वंजारी, हरीश नायडू, संध्या पुनियानी, मुकेश गजभिये यांनी सहकार्य केले.

Web Title: Twenty-four hours to get the amount