Video : कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य, गाव कुणी बसविले याचे ठोस पुरावे नाहीत; पण, २४ मंदिरे आहेत दफन

नीलेश झाडे
Saturday, 17 October 2020

बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.

धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेले गाव आज भकास अन् मागासलेले आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविले याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत.

इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेले आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेले मोठे शहर अन् बाजारपेठ होते. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल २४ मंदिरे दफन आहेत.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.

मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा!

गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरुवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

आता भिवकुंड झाली गावाची ओळख

कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty four temples are buried in Kude Nandgaon of Chandrapur