
सरतपासात सागर गायकवाड यांनी जळीत घटना कशी घडली तसेच आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने पीडितेच्या अंगावर कसे पेट्रोल टाकले याबाबतची घटना न्यायालयासमोर कथन केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांची अडीच तास उलटतपासणी घेतली.
हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह दोघांची साक्ष पूर्ण झाली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची आरोपीच्या वकिलांनी तब्बल दोन तास उलटतपासणी केली. यात प्रत्यक्षदर्शीने पूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर सादर केला. प्रत्यक्षदर्शीसह न्यायालयात आठ जणांची साक्ष पूर्ण झाली आहे. मंगळवारी अंकितावर उपचार करणारे डॉक्टर आणि महाविद्यालयातील सहशिक्षिकेची साक्ष सरकारी पक्षातर्फे नोंदविली जाणार असल्याची माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणी जानेवारी महिन्यात थांबलेल्या सुनावणीला सोमवारपासून पुन्हा सुरुवात झाली. कामकाज सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्यासमोर सुरू झाले. यात प्रारंभी आरोपीची ओळख परेड घेणारे कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार विजय पवार यांचा मागील तारखेला अपूर्ण राहिलेला उलटतपास पूर्ण झाला.
बचाव पक्षाच्या वकिलांनी दोन तास त्यांची उलटतपासणी घेतली. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सागर गायकवाडची साक्ष नोंदविली. सरतपासात सागर गायकवाड यांनी जळीत घटना कशी घडली तसेच आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने पीडितेच्या अंगावर कसे पेट्रोल टाकले याबाबतची घटना न्यायालयासमोर कथन केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांची अडीच तास उलटतपासणी घेतली.
सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात झालेल्या दोन साक्षीदारांशिवाय मागील तारखांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभय तळवेकर, अंकिताचे वडील अरुण नागोराव पिसुड्डे, आई संगीता, शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या श्रीमती देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, घटनास्थळावरील पंच सचिन बुटले असे एकूण आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ७७ साक्षीदार आहेत. त्यातील आवश्यक साक्ष सरकारी पक्षातर्फे नोंदविली जाणार आहे. सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील ॲड. वैद्य यांनी सहकार्य केले तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला. कामकाजादरम्यान या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव उपस्थित होत्या. न्यायालयीन परिसरात आरोपी विक्कीच्या पत्नीसह कुटुंबीयही उपस्थित होते.