मेट्रो रेल्वेच्या वॉर्डनला ट्रेलरने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नागपूर - वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये मेट्रोचा वॉर्डन आणि एका वृत्तपत्र कार्यालयातील वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघातांची नोंद घेतली असून, आरोपी चालकांवर गुन्हा दाखल केला. वैभव प्रभाकर गाडेकर (वय १९) आणि चंद्रशेखर देशमुख (वय ५८) अशी मृतांची नावे आहेत. 

नागपूर - वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये मेट्रोचा वॉर्डन आणि एका वृत्तपत्र कार्यालयातील वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघातांची नोंद घेतली असून, आरोपी चालकांवर गुन्हा दाखल केला. वैभव प्रभाकर गाडेकर (वय १९) आणि चंद्रशेखर देशमुख (वय ५८) अशी मृतांची नावे आहेत. 

मेट्रोचे सिमेंटचे गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून वॉर्डनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात चिंचभवन पुलानजीक प्राइड हॉटेलच्या समोर मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडला. वैभव प्रभाकर गाडेकर (१९, रा. न्यू सुभेदार ले-आऊट, सक्करदरा) नागपूर असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव गाडेकर नागपूर मेट्रो येथे वॉर्डन म्हणून काम करीत होता. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास (एनएल ०२ /एन १३२५ क्रमांकाचा) ट्रेलर क्रॉसिंग यार्ड जामठा येथून गर्डर घेऊन अजनी चौक, मध्यवर्ती कारागृहासमोर पोहोचविण्यासाठी जात होता. रात्री वाहतूक नसल्यामुळे कारागृहाकडे जात असताना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचभवन रेल्वे पुलाजवळ वैभव गाडेकर हा वाहतूक नियोजनाकरिता चालत्या ट्रेलरमधून खाली उतरला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने सुरू असलेली वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाने त्याच्या वाहनाचा वेग वाढविला. त्यामुळे वैभव गाडेकरला ट्रेलरची जबर धडक बसली आणि तो ट्रेलरच्या चाकाखाली आला. गंभीर जखमी झालेल्या वैभव गाडेकरचा  घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी चालक ट्रेलर सोडून पळून गेला. या प्रकरणी फिर्यादी पांडुरंग रुमाजी मडावी (१९, रा. दातेनगर, सक्करदरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसठाण्यात आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

ट्रक धडकल्याने देशमुखांचा मृत्यू 
दुसऱ्या घटनेत, चंद्रशेखर रामभाऊ देशमुख (रा. ऊर्विला कॉलनी, छत्रपतीनगर) हे आज बुधवारी सकाळ नऊला दुचाकीने घराकडे जात होते. छत्रपती चौक ते मानेवाडा रोडवर असलेल्या प्रगती बसस्टॉपसमोर भरधाव येणाऱ्या ट्रकने देशमुख यांना जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी राहुल खेवले यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गेल्या अनेक वर्षांपासून एका वर्तमानपत्रात वितरण विभागामध्ये नोकरी करीत होते. त्यांच्यापश्‍चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

उभ्या ट्रेलरखाली आला चालक 
ट्रेलरखाली आल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमना ठाण्याअंतर्गत भंडारा मार्गावरील उमिया औद्योगिक वसाहत येथे घडली. सुब्रमणी सुबरैया (४५, रा. तमिळनाडू) असे मृताचे नाव आहे. सुब्रमणी ट्रेलरमध्ये माल लोड करून उमिया वसाहत येथे आले होते. दुपारी रिकामा वेळ असल्याने ते परिसरात उभ्या दुसऱ्या ट्रेलरखाली विश्रांती घेत होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्या ट्रेलरच्या चालकाने ट्रेलर सुरू करून समोर घेतला. त्याला सुब्रमणी त्याच्या ट्रेलरखाली झोपल्याची माहिती नव्हती. या घटनेत ट्रेलरच्या चाकाखाली येऊन सुब्रमणीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

Web Title: two dead in accident