सेल्फी काढताना केली स्टंटबाजी, पाचही जणांनी घेतले हातात हात आणि... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

कारंजा तालुक्‍यातील उमरी येथील पाच जण धावसा (हेटी) येथील मित्राला घेऊन तलाव परिसरात फिरायला गेले होते. निसर्गरम्य परिसरात मित्रांसोबत सेल्फी काढायचा मोह त्यांना आवरला नाही.

कारंजा (जि. वर्धा) : आषाढसरींसोबतच नद्या, नाले ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तलावांची पाणीपातळीही वाढली. निसर्गाने मुक्‍त हस्ते उधळण केल्याने अनेकांची पावले आपसुकच तलाव, ओढे, नदीकिनाऱ्याकडे वळतात. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक असते. सोशल मीडियाच्या आजच्या युगात निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी घेण्याची जणू क्रेझच आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसांत अशा ठिकाणी नक्‍की जा, परंतु संभावित धोके लक्षात घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. तलाव परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांनाही सेल्फीचा भारी नाद. परंतु अतिउत्साह नडला आणि ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्‍यातील उमरी येथील पाच जण धावसा (हेटी) येथील मित्राला घेऊन तलाव परिसरात फिरायला गेले होते. निसर्गरम्य परिसरात मित्रांसोबत सेल्फी काढायचा मोह त्यांना आवरला नाही. तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असताना दोघांना जलसमाधी मिळाली तर तिघे बचावले. ही घटना रविवारी (ता. पाच) दुपारच्या सुमारास घडली. तेजस राजू चोपडे (वय 15) आणि हर्षल संजय चौधरी, दोघेही रा. उमरी अशी मृतांची नावे आहेत. 

निसर्गरम्य परिसरात सेल्फी काढण्यासाठी खास उमरी येथून हे मित्र धावसा (हेटी) येथील तलावावर आले. काही काळ ते तलावाच्या आजूबाजूला फिरले आणि फोटोसेशन केले. परंतु सेल्फी काढताना संपूर्ण तलाव मागे दिसावा, असा काहींचा आग्रह होता. सेल्फीच्या नादात तलावात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीच्या बाजूला खोल खड्डयाजवळ सेल्फी काढत असताना एकाचा पाय घसरला. 

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य
 

यावेळी उपस्थित चौघांनी एकमेकांचे हात धरून साखळी करून वाचवायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात प्रयत्नात पाचही तलावात पडले. धावसा (हेटी) येथील एक मित्र हर्षल धनराज कालभूत बाहेर काही अंतरावर उभा होता. हा प्रकार त्याच्या लक्षात येत पाय एकएक करीत तिघांना बाहेर काढले. मात्र, दोघांना वाचविण्यात अपयश आले. 

आषाढी पौर्णिमेच्या दिवशी घटना घडल्याने दोन्ही गावात शोककळा पसरली. ही घटना घडताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक बबन मोहडुळे, नीतेश वैद्य, गुड्डू थूल, निखिल फुटाणे घटनास्थळी पोहोचले. तलावात चार जणांकडून शोधकार्य करण्यात आले. आशिष कोटजावरे, रोशन कुंभरे, मारोती मिश्रा, उत्तम कोटजावरे, सतीश पंचभाई यांनी दोन्ही मृतदेहांना बाहेर काढले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two drowned in the lake in the sound of selfie, three rescued