दोनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे

मंगेश गोमासे
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नागपूर  : विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाच्या तब्बल दोनशे महाविद्यालयांना टाळे लागले आहे. पाच वर्षांपासून अभियांत्रिकीची संख्या झपाट्याने घटत आहे. नोकऱ्याच मिळत नसल्याने अभियांत्रिकीची वीण उसवल्याचे बोलले जाते. 

नागपूर  : विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाच्या तब्बल दोनशे महाविद्यालयांना टाळे लागले आहे. पाच वर्षांपासून अभियांत्रिकीची संख्या झपाट्याने घटत आहे. नोकऱ्याच मिळत नसल्याने अभियांत्रिकीची वीण उसवल्याचे बोलले जाते. 
बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करणार, असा प्रश्‍न विचारला असता दहापैकी आठ विद्यार्थी अभिमानाने इंजिनिअरिंग असे सांगत होते. आपला मुलगा इंजिनिअरिंगला आहे याचे पालकांनासुद्धा कौतुक वाटत होते. मात्र, रोजगार मिळत नाही आणि व्यवसाय थाटता येत नसल्याने इंजिनिअरिंगच्या अभ्यासाची वीणच उसवल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत शंभर महाविद्यालयांना राज्यात टाळे लागले. व्यवस्थापन अभ्यासक्रमाचीही हीच स्थिती आहे. 
राज्यात उच्च शिक्षणाच्या दृष्टीने तीन राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांची भर गेल्या पाच वर्षांत पडली. यात आयआयएम, ट्रिपल आयटी, राष्ट्रीय विधी विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल, असे चित्र दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात या संस्थांमध्ये बोटावर मोजण्याइतके राज्यातील विद्यार्थी समाविष्ट आहेत. त्यामुळे या संस्था राज्यात आल्या असल्या तरी, विद्यार्थ्यांना त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळालेला नाही. याउलट विद्यार्थी मिळत नसल्याने अनेक संस्थांना टाळे लावण्याची वेळ आली. यात विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्तीचा परतावा मिळत नसल्याचे कारणही महत्त्वपूर्ण ठरले. याच प्रकारातून महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढू लागल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे 2015-16 या कालावधीत अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शाखेतील चार-चार महाविद्यालये बंद झाले. त्याच्या पुढल्याच वर्षी 36 महाविद्यालयांनी महाविद्यालये बंद केली. 2017-18 दरम्यान सर्वाधिक 110 महाविद्यालयांनी टाळे लावले. 2019-20 यादरम्यान 46 महाविद्यालयांची भर पडली. पाचही वर्षांचा विचार केल्यास दोन्ही शाखेतील 200 महाविद्यालये बंद पडली. 
फार्मसीत 207 महाविद्यालयांची भर 
अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शाखेत एकीकडे सातत्याने महाविद्यालये बंद पडत असताना, फार्मसी अभ्यासक्रमात जवळपास 207 नव्या महाविद्यालयांची भर पडली. सर्वाधिक 77 नवी महाविद्यालये 2019-20 या शैक्षणिक वर्षात सुरू झाले आहेत. 2015-16 या वर्षात 367 असलेली महाविद्यालये 2019-20 या वर्षात 544 वर पोहोचली आहेत. यामागे विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमाला असलेली पसंती होय. मात्र, राज्यात 5 वर्षात केवळ 56 नव्या महाविद्यालयांचीच भर पडलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two hundred engineering colleges locked