
राजुरा (जि. चंद्रपूर) ः राजुरा वनपरिक्षेत्रात सात ते आठ महिन्यांपासून नऊ जणांचा बळी घेणारा नरभक्षी वाघ अजूनही वनविभागाच्या हातात आला नाही. दोनशे कर्मचारी आणि दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही नरभक्षी वाघ सापडत नसल्याने या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वनविभागाने मागितली होती. मात्र, तो अजूनही सापडला नाही. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिसेंबरपर्यंत वाघाला पकडण्याची मुदत मागितली. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
मागील सात ते आठ महिन्यांपासून राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत या क्षेत्रात वाघाने नऊ लोकांचा बळी घेतला, तर चार लोकांना गंभीर जखमी केले. शेकडो पाळीव जनावरे आजवर या नरभक्षी वाघाने फस्त केली. अजूनही जनावर आणि शेतकऱ्यांवर वाघाचे हल्ले सुरूच आहेत. या नरभक्षी वाघाला ठार मारण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधींनी वनविभागाकडे लावून धरली. नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यानंतर वाघाला पकडण्यासाठी शासनाने वनविभागाला आदेश दिले. त्यानुसार मागील तीन महिन्यांपासून वाघ पकडण्याची मोहीम सुरू आहे.
प्रथम ३० सप्टेंबरपर्यंत वाघाला पकडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या कालावधीत वाघ अजूनही जेरबंद झालेला नाही. वाघाचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे परवानगी वाढून घेण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. त्या अनुषंगाने नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाघाला पकडण्यासाठी जवळपास २०० जणांचा ताफा तैनात आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रात जवळपास १५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
या माध्यमातून वाघाची हालचाल वेळोवेळी तपासण्यात येत आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये दहा ते पंधरा लोकांचे युनिट वाघाच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
प्रत्येक युनिटद्वारे आलेली माहिती शूटरपर्यंत देण्यात येत आहे. सध्या वाघाला पकडण्यासाठी दोन शॉर्पशूटर वन विभागाच्या टीमसोबत तैनात आहेत. नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, विरुर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी, कर्मचारी या मोहीमेत सहभागी आहेत.
वाघाला जिवंत पकडणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे. सोबतच या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यावर वन विभागाने भर दिला आहे. अतिसंवेदनशील भागामध्ये गुराख्यांना जंगलात गुरे चराई करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. दवंडी पिटून जंगलालगतच्या गावांतील नागरिकांना शेतावर एकटे जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणारा वाघ हा पाच ते सहा वर्षांचा असावा, असा अंदाज आहे. त्याच्या पगमार्गवरून हा अंदाजे दोनशे किलो वजन व पावणेदोन मीटर लांबीचा नर वाघ आहे. वेगवान धावून भक्षाची शिकार करण्याची प्रवृत्ती या वाघात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जनावरे व शेतकऱ्यांवर तो हल्ले करीत असावा.
- अमोल गरकल, उपविभागीय वनाधिकारी, राजुरा.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.