esakal | गट्टा-जांबिया जंगलात पोलिस अन् नक्षल्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

बोलून बातमी शोधा

Naxal
गट्टा-जांबिया जंगलात पोलिस अन् नक्षल्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांअंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात पोलीस- नक्षल चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा: 'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

गट्टा-जांबिया पोलिस मदत केंद्राजवळ २२ एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार केला होता. यावेळी सतर्क होऊन पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले. रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षल्यांनी हा गोळीबार केला होता. शिवाय एक हॅन्डग्रेनेडही पोलिस मदत केंद्रावर फेकला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिस दलाने परिसरात नक्षलविरोधी शोधमोहिम राबविली असता दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी त्यास प्रत्यत्तर देत गोळीबार केला असता या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिस दलास यश मिळाले आहे.

हेही वाचा: बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी २६ एप्रिल रोजी नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली-तुमरगुडा रास्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. यात २ पाणी टँकर, ३ ट्रॅक्टर व १ जॉन डिअर ट्रॅक्टरचा समावेश आहे. तसेच घटनास्थळी बॅनर व पत्रके आढळून आली होती यात 'समाधान' नावाने सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतिकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या 'प्रहार दमन' अभियानाच्या विरोधात एप्रिल २०२१ या महिनाभर प्रचार आणि जनआंदोलन उभे करा, असे आवाहन करत २६ एप्रिल रोजी या दमन मोहीमेच्या विरोधात भारत बंद करा, असे आवाहनही करण्यात आले होते. तसेच युवक, युवतींनो, नवजनवादी भारत निर्माण करण्याकरिता पीएलजीएमध्ये भर्ती व्हा, शेतकरी, कामगार आदिवासी, दलित, महिला, बुध्दीजीवींचे संघर्ष जिंदाबाद!, नवजनवादी क्रांती जिंदाबाद, असा नारा पत्रकातून देण्यात आला होता. त्यावर पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली भारतीय कम्युनिस्ट पार्टी, असे नमूद करण्यात आले होते.