आणखी दोन दिवस उतरविता येणार पीकविमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

यवतमाळ : पंतप्रधान पीकविमा योजनेचे संकेतस्थळ संथ होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा उतरविता आला नाही. त्यामुळे शासनाने 29 जुलैपर्यंत पहिली मुदतवाढ दिली होती. यानंतरही फार सुधारणा न झाल्याने आता पुन्हा दोन दिवस मुदतवाढ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पिकांचा विमा उतरविता येणार आहे.

यवतमाळ : पंतप्रधान पीकविमा योजनेचे संकेतस्थळ संथ होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा उतरविता आला नाही. त्यामुळे शासनाने 29 जुलैपर्यंत पहिली मुदतवाढ दिली होती. यानंतरही फार सुधारणा न झाल्याने आता पुन्हा दोन दिवस मुदतवाढ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पिकांचा विमा उतरविता येणार आहे.
खरिपातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना जाहीर करण्यात आली. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 24 जुलैपर्यंत अर्ज दाखल करावयाचे होते. त्याकरिता शेतकऱ्यांनी सीएससी केंद्राकडे धाव घेतली. मात्र, काही ठिकाणी लिंक, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याने शेतकऱ्यांना विमा उतरविता आला नाही. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता शासनाने 29 जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत वाढून दिली होती. मुदतवाढ दिल्यानंतरही स्थितीत फार सुधारणा झाली नाही. अडचणी कायम असल्याने शेतकऱ्यांना विमा उतरविताना नाकी नऊ आले होते. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पीक संरक्षित केले नसल्याने 31 जुलैपर्यंत पीकविमा उतरविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसे आदेश कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्या अवर सचिव नीता शिंदे यांनी काढले आहेत. जे शेतकरी अडचणींमुळे पीकविमा उतरवू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांना आता बुधवारपर्यंत (ता.31) पीकविमा काढता येणार आहे.

तीन लाख शेतकरी सहभागी
जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या शेतातील पीक संरक्षित केले आहे. 69 हजार 364 शेतकरी कर्जदारांनी विमा उतरविला आहे. दोन लाख 36 हजार 965 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनीही यंदा मोठ्या प्रमाणात विमा उतरविला आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत 19 कोटी विमा हफ्ता भरला असून, आणखी दोन दिवसांत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या 31 जुलैला क्‍लिअर होणार असल्याने हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more days off crop insurance