नागपूर शहरात दोन हत्याकांडांनी नववर्षाला 'सलामी'

File photo
File photo

नागपूर - पोलिस आयुक्तांनी नव्या वर्षात शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला असतानाच इमामवाड्यात सहा जणांनी एकाला घरातून खेचून गुप्तीने आतड्या बाहेर काढल्या. दुसरीकडे एमआयडीसीत सात युवकांनी दोघांवर तलवार-चाकूने सपासप वार करीत हल्ला केला. यामध्ये एका युवकाचा जागीच खात्मा झाला, तर दुसरा जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहे.

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "थर्टी फर्स्ट'निमित्त शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. मुख्य चौकाचौकांत कडाक्‍याच्या थंडीत पोलिस कर्मचारी कुडकुडत पहारा देत होते. मात्र, इमामवाड्यात वर्चस्व गाजविण्यासाठी एका गॅंगने निष्पाप असलेल्या युवकाच्या घरावर हल्ला केला. आरोपी शुभम ऊर्फ सर्किट तायडे (20), मुकुल ऊर्फ टिक्‍या पडोळे (19), गिरीष देवराव वासनिक (30), ऋषिकेश उईके (22, सर्व. रा. जातरोडी) आणि त्यांचे दोन मित्र असे सहा जण सोमवारी रात्री बाराला जाटतरोडीतील अक्षय लेखाराम वाघमारे याच्या घरासमोर आले. त्याच्या घराला लाथा मारून बाहेर निघण्यास चेतावणी देत होते. आकाश ऊर्फ दीपक लेखाराम वाघमारे याने दरवाजा उघडला. दरम्यान, आरोपींनी त्याला घरातून खेचत बाहेर आणले. त्याच्यावर चाकू, तलवार, गुप्ती अशा शस्त्रासह तुटून पडले. अर्धा तासपर्यंत आरोपींनी आकाशवर शस्त्रांनी वार करीत ठार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. या प्रकरणी अक्षय वाघमारेच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक केली असून अन्य पाच आरोपी अद्याप फरार आहेत.

वर्चस्वातून गुंडाचा खून
एमआयडीसी परिसरात दोन गुंडांच्या टोळ्या एकमेकांसमोर भिडल्याने दोघांवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लडी ऊर्फ रणजित रामप्रसाद धानेश्‍वर (वय 19, रा. राजीवनगर, झेंडा चौक) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे, तर नस्सू ऊर्फ सन्नी असे जखमीचे नाव आहे. या हत्याकांडात एमआयडीसी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली. लडी धानेश्‍वर आणि नस्सू हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर डझनावर गुन्हे दाखल असून अनेकदा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली आहे. ते दोघेही वस्तीत दादागिरी करीत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर काळे गॅंगमधील सचिन रमेश काळे, स्वप्नील काळे, नीतेश काळे, मंगेश काळे, शंकर लाला राऊत, गोवर्धन लाला राऊत, उमादास लिल्हारे यांचाही वस्तीत दबदबा निर्माण करण्यासाठी दादागिरी सुरू असते.

सोमवारी रात्री बाराला काळे गॅंगने डीजे लावून 31 डिसेंबरला पार्टीचे आयोजन केले होते. रात्री साडेअकराला रणजित व नस्सू तिथे गेले. तेथे काही महिला व तरुणी नृत्य करीत होत्या. या दोघांनी महिलांमध्ये जाऊन नाचण्यास सुरुवात केली. तसेच महिलांची छेडही काढत होते. प्रकार लक्षात येताच काळे गॅंगने दोघांनाही हाकलून लावले. त्यानंतर काही वेळातच ते दोघे दंडा घेऊन परत आले. त्यांनी स्वप्नील काळेला मारहाण केली. त्यामुळे काळे गॅंगने घरातून धारदार शस्त्रे काढली आणि लडी आणि नस्सू यांना घेरून फिल्मी स्टाइलने सपासप वार करीत रक्‍तबंबाळ केले. नस्सूने मेल्याचा अभिनय करीत पडून राहिला, तर लडी हा जीव मुठीत धरून घरापर्यंत पळत गेला. आरोपींनी घरासमोरच लडीचा निर्घृणपणे खून केला. या आरडाओरडीत रणजितची आई व बहीण घराबाहेर आल्या, तर दोघेही त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसले. लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. रणजित हा महिन्याभरापूर्वीच कारागृहातून जामिनावर सुटून आला होता.

पोलिस ठाण्याला घेराव
जाटतरोडीतील शेकडो नागरिक आज मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास इमामवाडा पोलिस ठाण्यावर धडकले. नागरिकांनी आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली. वाढता जमाव बघता इमामवाडा पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com