दुर्गा विसर्जन करताना दोन भावंडांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

रावणवाडी (जि. गोंदिया) : गाव तलावात दुर्गा विसर्जन करताना दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 8) रात्री 11 च्या सुमारास बघोली (कलारीटोला) येथे घडली.
आकाश तेलासे (वय 23) व अक्षय तेलासे (वय 20, दोघेही रा. बघोली) अशी मृतांची नावे आहे. दोन्ही सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

नवरात्रोत्सवादरम्यान, बघोली येथे दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली होती. मंगळवारी रात्री ढोलताशांच्या गजरात 10 ते 12 च्या संख्येतील भाविक युवकांनी मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली. रात्री 11 च्या सुमारास गावतलावात मूर्ती विसर्जनाकरता आणण्यात आली. मूर्ती विसर्जन करीत असताना आकाश बुडाल्याचे काही वेळाने लक्षात आले. त्यामुळे अन्य युवकांनी तलावात उडी घेऊन आकाशला बाहेर काढले.
या वेळी तो बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे त्याला ताबडतोब गोंदियाच्या खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. आकाशच्या मृत्युमुळे सारे शोकमग्न असतानाच आकाशचा भाऊ अक्षयदेखील बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा युवकांनी तलावाकडे धाव घेतली. अंधार असल्यामुळे शोधकार्य करता आले नाही. आज, बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास तलावात शोध घेतला असता अक्षयाचादेखील मृतदेह तलावात तरंगताना आढळला. दरम्यान, दोन्ही भावंडांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन गावडे करीत आहेत. सायंकाळी चारच्या सुमारास दोघांवरही स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two siblings drown in Durga immersion