esakal | मिळेल ते काम करून मुलांना बनविलं डॉक्टर, कामगाराचा मुलगा देशाच्या राजधानीत देतोय 'आरोग्यसेवा'

बोलून बातमी शोधा

ज्ञानेश्वर बाहुटे
मिळेल ते काम करून मुलांना बनविलं डॉक्टर, कामगाराचा मुलगा देशाच्या राजधानीत देतोय 'आरोग्यसेवा'
sakal_logo
By
श्रीनाथ वानखडे

मांजरखेडक (जि. अमरावती) : हातात कृषी पदविका असताना नियतीने शासकीय नोकरीची संधी गमावली. कारखान्यात राबराब राबून मुलांना शिक्षण दिलं. आज त्याच कामगाराचा एक मुलगा देशाची राजधानी दिल्ली येथे कोरोनाग्रस्तांच्या सेवेत आहे, तर दुसरा मुलगा राज्याच्या उपराजधानीत आरोग्याचे धडे गिरवतोय. यवतमाळातील दाभा (पहूर ) येथील गुरुदेव भक्त असलेले ज्ञानेश्वर बाहुटे यांनी परिस्थितीशी झगडत दोन्ही मुलांना डॉक्टर बनविले. त्यांच्या या परिश्रमामुळे परिसरात बाहुटेंचा नावलौकिक वाढत आहे.

हेही वाचा: कडक निर्बंधात व्यवसाय बदलण्याची वेळ; कोणी विकतो भाजीपाला, तर कोणी करतो फळविक्री

शालेय शिक्षणानंतर ज्ञानेश्वर बाहुटे यांनी नोकरीसाठी परिश्रम केले. मात्र, नियतीने हुलकावणी दिली. साधारणतः १९८८ च्या दरम्यान देवगाव येथील सहकारी साखर कारखाना येथे सहायक म्हणून कामाला सुरुवात केली. काही कालावधीनंतर देवगाव साखर कारखाना बंद पडला. पुन्हा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. यादरम्यान कधी पुस्तक विकून तर कधी यात्रेमध्ये कपडे विकून कुटुंबाचे पालनपोषण केले. त्यानंतर अकोला येथील साखर कारखाना येथे रोजगार मिळाला. यादरम्यान मोठ्या भावाला दुर्धर आजार जडल्याने गावी परत यावे लागले. भावाच्या मृत्यूनंतर दोन कुटुंबाची जबाबदारी आली. याकालावधीत शेती करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर दोन्ही संयुक्त कुटुंबाचा खर्च निघत नव्हता. पूर्वानुभव व शेतीच्या अनुभवावर जैविक औषधीचे काम स्वीकारले. त्यातही भागत नसल्यामुळे घरी उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान सुरू केले. मुलांच्या जन्मानंतर दोन्ही मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. माझे स्वप्न माझ्या मित्रांसाठी गंमतीचा विषय ठरू लागला. खिशात पैसे नसताना मुलं डॉक्टर होणार तरी कशी?

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

स्वप्नाला परिश्रमाची जोड देत अगोदर सिमेंट एजन्सी त्यानंतर अन्न धान्याचा व्यवसाय केला. थोडं कर्ज काढून मोठ्या मुलाचा वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. लहान मुलाच्यावेळी आर्थिक परिस्थिती दयनीय असताना बँकेद्वारा पुन्हा पैसा उभारला. आज दोन्ही मुलं डॉक्टर झाल्याने गावात व परिसरात मान वाढला. अथक परिश्रम व गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आज दिवस पालटल्याचे ज्ञानेश्वर बाहुटे यांनी सांगितले.

राजधानीत रुग्णसेवा -

मोठा मुलगा प्रतिक प्रखर बुद्धीचा असल्याने बीएएमएस ला गुणवत्ता यादीत आला. एम.डी च्या प्रवेशपरीक्षेत सुद्धा बुद्धीमत्तेची चुणूक दाखवत देशातील सर्वोच्च आयुवेर्दिक संस्थेत प्रवेश मिळवला. आज डॉ. प्रतिक देशाच्या राजधानीत गेल्या एक वर्षापासून कोरोना ग्रस्त रुग्णांची सेवा करतोय, तर त्याचा लहान भाऊ डॉ. प्रज्वल हा राज्याच्या उपराजधानीत वैद्यकीय शिक्षणातील अंतिम धडे गिरवतोय.