एका क्षणात झाले होत्याचे नव्हते! दोन हजार क्‍विंटल कापूस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

जिनिंग मोटारीमधून अचानक ठिणग्या निघाल्या आणि सूर्य आग ओकत असताना कापसाने पेट घेतला. त्यातच हवेमुळे ठिणग्या उडून बाहेरच्या दोन कापसाच्या गंजींना आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत दोन हजार क्‍विंटल कापसाच्या दोन गंजा (ढीग) जळून खाक झाल्या

सेलू (जि. वर्धा) : सुकळी रोडवरील गिरिराज जिनिंग प्रेसिंगमधील सीसीआयच्या खरेदी केलेल्या कापसाला जिनिंगमधील मोटारीमधून ठिणग्या निघाल्याने आग लागली. यात दोन हजार क्‍विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (ता. 23) दुपारी 12 वाजता घडली.
23 ते 25 मेपर्यंत सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. सेलू सुकळी रोडवरील गिरिराज जिनिंग-प्रेसिंगमध्ये दुपारी बाराच्या सुमारास काम सुरू होते. दरम्यान, जिनिंग मोटारीमधून अचानक ठिणग्या निघाल्या आणि सूर्य आग ओकत असताना कापसाने पेट घेतला. त्यातच हवेमुळे ठिणग्या उडून बाहेरच्या दोन कापसाच्या गंजींना आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत दोन हजार क्‍विंटल कापसाच्या दोन गंजा (ढीग) जळून खाक झाल्या. तसेच जिनिंगचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळी ठाणेदार सुनील गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे, सचिव आय. आय. सुफी, युवा उद्योजक वरून दफ्तरी, कपिल चांडक, महेश सिंघानिया यांच्यासह समाजसेवकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बुटी बोरी, सिंदी नगरपालिका, उत्तम गालवा मेटॅलिक लिमिटेड भूगाव, नगरपालिका वर्धा या चार ठिकाणाहून अग्निशमदन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच ऍपकॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीचे पाण्याचे टॅंकर आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता बोलविण्यात आले.  

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ
जिथे आग लागली त्याच बाजूला कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या होत्या, परंतु हवेचा झोत बाहेरच्या दिशेने असल्याने फक्त कापसाचा (ढीग) गंज्यात पेटल्या. त्यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand quintal cotton burnt in fire