उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे : किशोर तिवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

यवतमाळ : राज्यात भाजप-सेनेची युती झाल्यास युतीसोबत राहू, अन्यथा मोठा भाऊ असलेल्या शिवेसेनेच्या सामाजिक कार्याचा हिस्सा बनून शेतकऱ्यांसाठी काम करू, असे मत वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. शिवबंधन बांधल्यानंतर शनिवारी (ता. 21) दैनिक "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यवतमाळ : राज्यात भाजप-सेनेची युती झाल्यास युतीसोबत राहू, अन्यथा मोठा भाऊ असलेल्या शिवेसेनेच्या सामाजिक कार्याचा हिस्सा बनून शेतकऱ्यांसाठी काम करू, असे मत वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. शिवबंधन बांधल्यानंतर शनिवारी (ता. 21) दैनिक "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
विदर्भ जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची शेतकरी नेते म्हणून देशभर ओळख आहे. त्यांनी मुंबई येथील शिवसेना भवनात शुक्रवारी (ता. 20) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधून बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या घडामोडीवर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे कृषी, अध्यात्म, पर्यटनावर विशेष प्रेम आहे. शेतकऱ्यांसाठी खूपकाही करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करावे यासाठी त्यांच्यामागे शेतकऱ्यांची शक्ती उभी करू.
त्यांच्या सेना प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात भाजपचे किशोर तिवारी हे शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, किशोर तिवारी हे भाजपचे सदस्य कधीच नव्हते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शेतकरी मिशनचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना आपण लहान भावाकडून मोठ्या भावाकडे गेलो असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेतच भाजप राज्यात मोठी झाली. शिवसेना हाच भाजपचा मोठा भाऊ आहे. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने राहिली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे आपण शिवबंधन बांधले. आपण सत्तेसाठी शिवसेनेत प्रवेश केला नाही. मात्र, शिवसेनेच्या समाजकारणात आपला सक्रिय सहभाग असेल.
शिवसेनेचे अधिकृत सल्लागार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधताना शिवसेनेचे अधिकृत सल्लागार म्हणून काम करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभागी असणार आहे. शिवसेनेच्या वचननाम्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेची वाघनखे घालून भ्रष्टाचाराचे पोट फाडणार असल्याचे मतही किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray to become CM: Kishore Tiwari