esakal | यूजीसीच्या वेळकाढू धोरणाचा पदव्युत्तर मराठीला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

यूजीसीच्या वेळकाढू धोरणाचा पदव्युत्तर मराठीला फटका

sakal_logo
By
चंद्रशेखर महाजन

नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेळकाढू धोरणामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी आणि हिंदी या विषयांना अद्याप पुनर्परवानगी मिळाली नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. यूजीसीच्या या अडलेतट्टू धोरणाचा फटका अभ्यास केंद्रालाही बसला आहे.

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात शंभरावर अभ्यासक्रम शिकविले जातात. पारंपरिक अभ्यासक्रमापासून तर अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमांना मान्यता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यूजीसीने दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमांना पुनर्परवानगी घेण्याचे धोरण जाहीर केले आहे. यामुळे विद्यापीठाने यावर्षी इतर अभ्यासक्रमांसोबतच पदव्युत्तर मराठी, इंग्रजी आणि हिंदी विषयाला पुनर्परवानगी मिळावी, याकरिता प्रस्ताव सादर केले. यात प्रामुख्याने इंग्रजी विषयाला पुनर्परवानगी देण्यात आली. मात्र, मराठी, हिंदी विषयाला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. विद्यापीठाचे प्रवेश 1 जूनपासून सुरू झाले आहेत. नेहमीप्रमाणे विद्यापीठाने सशुल्क मुदतवाढसुध्दा दिली. यादरम्यान लाखो विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी विषयाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रयत्न केला. मात्र, त्यांना प्रवेश घेता आले नाही. यासंदर्भात विद्यापीठाशी काही विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असता येत्या काही दिवसांत प्रवेश सुरू होतील, असे सांगून विद्यार्थ्यांची समजूत घातली. मात्र, सत्र सुरू होण्याची वेळ आली तसेच प्रवेशप्रक्रिया बंद होण्यास अवघे सहा दिवस उरले असताना प्रवेश होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर होत आहे. तर विद्यापीठातील अधिकारी मराठी आणि हिंदी विषयाला पुनर्परवानगी मिळत नसल्यामुळे कासावीस झाले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयात सादर केलेल्या प्रस्तावावर काहीच उत्तर मिळत नसल्याने विद्यापीठ प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

अभ्यासकेंद्रेही अडचणीत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाची महाराष्ट्रात हजारांवर अभ्यासकेंद्रे आहे. या अभ्यासकेंद्रांत हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, यात पदव्युत्तर विभागातील मराठी आणि हिंदी विषयाला अधिक पसंती असते. मात्र, यावर्षी या विषयांना पुनर्परवानगीच न मिळाल्याने अभ्यासकेंद्रांचे प्रवेश झाले नाहीत. याचा परिणाम अभ्यासकेंद्रावर झाला असून अनेक प्राध्यापक वर्गावर घरी बसण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे केंद्रे आर्थिक अडचणीत सापडली आहेत.


इंग्रजीला मिळाली पुनर्परवानगी
यूजीसीला सादर केलेल्या प्रस्तावातील पदव्युत्तर इंग्रजी विषयाला पुनर्परवानगी मिळाली आहे. त्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. यूजीसीच्या इंग्रजी प्रेमामुळे विद्यार्थीही बुचकाळ्यात पडले आहेत.


विद्यापीठ प्रशासनाकडून यूजीसीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. नेमकी अडचण कुठे आहे याचा शोध घेणे सुरू आहे. मराठी विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घेऊन मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयांना पुनर्परवानगी मिळेल, अशी आशा आहे.
-डॉ. नारायण मेहेरे (वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार)
वायसीएमओयू, विभागीय कार्यालय, नागपूर

loading image
go to top