अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर केले लग्न; तीन वर्षांनी पतीला शिक्षा झाल्याने पत्नीने ढाळले अश्रू

संतोष ताकपिरे
Thursday, 28 January 2021

काही दिवसांनी त्याच युवकाने पीडितेसोबत लग्न केले. त्यांना अपत्ये झाली. शिरखेड ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मस्करे व एस. जी. तायवाडे यांनी याप्रकरणाचा तपास केला.

अमरावती : अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने गुरुवारी या खटल्याचा निवाडा दिला.

१५ मार्च २०१७ रोजी दुपारी पीडित ही शिकवणी वर्गावरून घराकडे परत जात असताना दुपारच्या सुमारास संशयित आरोपीने पीडितेला नजीकच्या शेतात निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला होता. घटनेच्या वेळी संशयित आरोपीसोबत एक साथीदारही हजर होता. हा प्रकार काहींनी पीडितेच्या नातेवाईकांना सांगितला. ज्यावेळी नातेवाईक घटनास्थळी गेले, तेव्हा आरोपीने तेथून पळ काढला.

अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

पीडितेच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी त्यावेळी संशयित युवकाविरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याच युवकाने पीडितेसोबत लग्न केले. त्यांना अपत्ये झाली. शिरखेड ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मस्करे व एस. जी. तायवाडे यांनी याप्रकरणाचा तपास केला.

९ जून २०१७ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.

दंड न भरल्यास आरोपीस एक वर्षे अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. मुख्य सूत्रधारासोबत घटनेच्या वेळी असलेल्या त्याच्या मित्राची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. पतीला शिक्षा झाल्याचे बघून पीडितेने अश्रू ढाळले.

जाणून घ्या - खोल पाण्याकडे पाहत घुटमळत होती तरुणी, काही क्षणातच घडलेल्या प्रसंगाने उपस्थितही चक्रावले

पीडिता न्यायालयात फितूर

युवती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार झाला. त्यात न्यायालयाने एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेचाही मुख्य पुरावा होता. परंतु, पीडितेला न्यायालयाने फितूर घोषित केले, असे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. मिलिंद जोशी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth sentenced to 10 years rigorous imprisonment in atrocity case