जागलीसाठी काका-पुतण्या शेतात गेले आणि पुतण्यासोबत घडले असे

file photo
file photo

आर्वी (जि. वर्धा) : धनराज चौरे व सहादेव चौरे चिंचोली (डांगे) येथील रहिवासी आहेत. चिंचोली (डांगे) लगतच्या टिटोना मौज्यात धनराज चौरे यांचे स्वत:चे शेत आहे; तर त्यांच्या शेताला लागून असलेले दिगंबर चौरे यांचे शेत काका-पुतण्याने वाहितीकरिता घेतले आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे.

धनराज सखाराम चौरे (वय 55) असे मृत पुतण्याचे; तर सहादेव देवचंद चौरे (वय 70) असे गंभीर जखमी असलेल्या काकाचे नाव आहे.

रात्रीदरम्यान, वन्यप्राणी शेतात शिरून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे या दोन्ही शेतातील शेतमालाची रखवाली करण्याकरिता काका-पुतणे दररोजप्रमाणे शनिवारी रात्री जागलीवर गेले होते.

डोक्‍यात तीक्ष्ण हत्याराने वार

दरम्यान, अनोळखी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यात धनराज चौरे यांच्या डोक्‍यात तीक्ष्ण हत्यारामुळे छिद्र पडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला; तर काका सहादेव चौरे यांच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याने ते गंभीर जखमी झाले.

रविवारी सकाळी उघडकीस आली घटना

रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास शेतात गेलेल्या बेढोणा येथील शेतकऱ्याला हे दृश्‍य दिसले. त्यांनी याची माहिती सरपंच शैलेश मारघोडे व गावकऱ्यांना दिली. पाचोड येथील पोलिस पाटील चंदू राठोड यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, ठाणेदार संपत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, रवींद्र खेडकर तथा पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून तातडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध आर्वी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

जागलीला जाणाऱ्यांमध्ये भीती

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर आहे. सध्या शेतात रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा आहे. रात्री वन्यप्राणी शेतात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे अनेक शेतकरी रात्री जागलीला जाऊन पिकांचे संरक्षण करतात. वेळप्रसंगी वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्लासुद्धा चढवितात. मात्र, चिंचोली डांगे शिवारात अनोळखी मारेकऱ्यांनी काका-पुतण्यावर हल्ला केल्याने तर्कवितर्क लावले जात असून जागलीला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com