अबब! सव्वा कोटीची बेहिशेबी मालमत्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

मोठ्या प्रमाणावर संपत्ती आढळून आल्याने एसीबीने उघड चौकशी सुरू केली होती. त्यात बॅंक खाते, वित्तीय आस्थापना, दुय्यम निबंधक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सविस्तर माहिती घेऊन तपासणी करण्यात आली. उत्पन्नाचे सर्व स्त्रोत, अचल संपत्तीचे अंकेक्षण करण्यात आले.

नागपूर : लाचखोर सहायक मोटार वाहन निरीक्षकाकडे तब्बल सव्वा कोटीची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरुद्ध पदाचा दुरुपयोग करीत गैरमार्गाने अपसंपदा जमविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूर कार्यालयात कार्यरत असताना दोन हजारांची लाच स्वीकारताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला होता.

 

मिथुन डोंगरे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तो केवळ तीन वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत आहे. 2018 मध्ये नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत होता. त्याच्या विरोधात प्राप्त तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 24 एप्रिल 2018 रोजी सापळा रचून दोन हजारांची लाच घेताना त्याला पकडले होते. त्यावेळी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता 1 कोटी 71 लाखांचे घबाड आढळून आले होते.

 

हे वाचाच - वारे डॉक्टर; युवतीला केली शरीरसुखाची मागणी

मोठ्या प्रमाणावर संपत्ती आढळून आल्याने एसीबीने उघड चौकशी सुरू केली होती. त्यात बॅंक खाते, वित्तीय आस्थापना, दुय्यम निबंधक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सविस्तर माहिती घेऊन तपासणी करण्यात आली. उत्पन्नाचे सर्व स्त्रोत, अचल संपत्तीचे अंकेक्षण करण्यात आले. नोकरीच्या अल्प कालावधीत पदाचा दुरुपयोग करून त्याने एकूण 1 कोटी 22 लाख 25 हजार 641 रुपयांची अपसंपदा जमा केल्याचे निष्पन्न झाल्याने शुक्रवारी काटोल पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

डोंगरे याने आपल्या कार्यकाळात मुंबई व नागपूर येथे सहायक मोटर वाहन निरीक्षक पदावर कार्य केले आहे. सध्या तो मुंबईतच कार्यरत असल्याची माहिती आहे.
पोलीस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सारंश मिराशी, हवालदार दिनेश शिवले, मंगेश कळंबे, रविकांत डहाट यांनी ही कारवाई केली.

जामिनासाठी उकंडे न्यायालयात

नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी महिलेला अडीच लाखांच्या लाचेची मागणी करणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पोलिस निरीक्षक पंकज उकंडे याने जामीन मिळविण्यासाठी शुक्रवारी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. अधिकारी महिलेच्या तक्रारीवरून 24 डिसेंबर रोजी सदर ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच उकंडे फरार आहे. तो शरण येणार असल्याचे बोलले जात असतानाच त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Undisclosed property To mithun dongare