बोरसे दाम्पत्याकडून ३० वर्षांपासून वृद्धांची अविरत सेवा; वृद्धाश्रमात गाडगे महाराजांच्या दशसूत्रीचे पालन

Uninterrupted service to the elderly for 30 years by the Borse couple
Uninterrupted service to the elderly for 30 years by the Borse couple

तिवसा (जि. अमरावती) : भुकलेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब मुलांना शिक्षण, बेघरांना आसरा या गाडगे महाराजांच्या सूत्राचे पालन फार कमी होताना दिसत आहे. महाराजांनी आपले आयुष्य सामाजिक परिवर्तन करून समाजातील घाण झाडूने साफ करण्यासाठी खर्ची घातले. त्यांच्या तत्त्वाचे पूर्ण पालन अमरावती जिल्ह्यातील पेढी नदीकाठावर असलेल्या गाडगे महाराज वृद्धाश्रमात आजही होत आहे. या वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. कैलास बोरसे ३० वर्षांपासून येथील वृद्धांचा सांभाळ करीत आहे.

संत गाडगे महाराजांनी १९५२ मध्ये गाडगे महाराज मिशनची स्थापना केली होती. २० फेब्रुवारी १९५६ रोजी गाडगे महाराजांचे निर्वाण वलगाव येथील पेढीनदीवर झाले. त्यानंतर १ मे १९६३ रोजी या ठिकाणी गाडगे महाराज वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली. १९९६ साली येथे डॉ. बोरसे यांची हंगामी संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गाडगे महाराज मिशनच्या साथीने येथील वृद्धांची सेवा करण्याचा निर्धार बोरसे कुटुंबांनी केला.

अनेक अडचणी आणि संकटांवर मात करून आज येथील नागरिकांच्या, मिशनमधील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या वृद्धाश्रमाच्या विकासाचा आलेख पुढे नेत गाडगे महाराजांच्या विचारांचा वसा पुढे चालविण्याचे कार्य याठिकाणी होत आहे. या वृद्धाश्रमामध्ये सर्वांना सर्व सोयीसुविधा दिल्या जात असून बेघरांना पूर्ण आसरा देऊन मनोरंजनासह कीर्तनाची देखील व्यवस्था केली जाते.

कोरोनाच्या महामारीतसुद्धा याठिकाणी प्रवेश दिला गेला. तसेच या काळात वृद्धांची विशेष काळजी घेऊन त्यांचा कोरोनापासून बचाव करण्यात कैलास बोरसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गाडगे महाराज निर्वाणभूमी स्थळाला पर्यटनक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा देऊन याठिकाणी ४० कोटींची विकासकामे घडवून आणण्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विशेष पुढाकार घेतला.

त्यांच्या हातून गाडगेबाबांचे कार्य अविरत पुढे सुरू राहावे यासाठी गाडगे महाराज मिशनच्या सभासद म्हणून पालकमंत्र्यांचा गौरवसुद्धा करण्यात आला आहे. इंदिराजींच्या काळात देशभरात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्‍टरांची कमी जाणवत होती. त्यावेळी पीएमपी हा कोर्स औरंगाबाद येथून १९९१ मध्ये कैलास बोरसे यांनी पूर्ण करून बुलडाणा जिल्ह्यामध्ये खेडोपाडी वैद्यकीय सेवा दिली होती.

... तर शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळू शकेल
गाडगे महाराजांचे जीवनचरित्र अभ्यासल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने कळली ती म्हणजे गाडगे महाराजांची दशसूत्री. ही दशसूत्री आज आपण अवलंबली आणि त्यावर कार्यरत राहिलो तर आज शेतकरी आत्महत्या थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल. या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून यापुढील काळात शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा आहे. 
- डॉ. कैलास बोरसे,
संचालक, संत गाडगे महाराज वृद्धाश्रम, वलगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com