esakal | "यवतमाळचा राजा'ने घेतला यंदा हा अनोखा निर्णय... काय तो वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmalcha Raja

शहरात "यवतमाळचा राजा' हे नावाजलेले व महत्वपूर्ण मंडळ आहे. दरवर्षी या मंडळांची स्थापना व विसर्जन मिरवणूक भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याशिवाय मोठमोठे देखावे बघण्यासाठी व दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक येतात.

"यवतमाळचा राजा'ने घेतला यंदा हा अनोखा निर्णय... काय तो वाचा 

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील श्रीगणेश उत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. यातही शहरातील "यवतमाळचा राजा' गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यातील भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा कोरोनाच्या संकटात या मंडळाने शासनाच्या नियमांच्या आधीन राहून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यंदा मूर्ती न ठेवता "थ्री डी इफ्केट' राहणार असून, ऑनलाइन आरती केली जाणार आहे. उत्सव निर्विघ्न करण्याचा संकल्प गणेश मंडळांनी केला आहे. 

यावर्षी खुद्द विघ्नहर्त्याच्या उत्सवावरच कोरोनाने विघ्न आणले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासनाने नियमावली आखून दिली आहे. या निमयावलीनुसारच यंदा विघ्नहर्त्याचा उत्सव साजरा होणार आहे. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत अनेक गणेश मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंडळांनी शासन आदेशानुसार मूर्तीची उंची कमी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

गरजवंतांना करणार मदत

शहरात "यवतमाळचा राजा' हे नावाजलेले व महत्वपूर्ण मंडळ आहे. दरवर्षी या मंडळांची स्थापना व विसर्जन मिरवणूक भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याशिवाय मोठमोठे देखावे बघण्यासाठी व दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक येतात. यंदा या मंडळांनी शासन निर्णयानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून त्या रकमेतून गरजवंतांची मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 

अवश्य वाचा-  भंडारा पोलिस, शाब्बास! क्रेडिट कार्डमधून पळवलेली रक्कम दिली मिळवून परत 

याआधीही लॉकडाउनच्या काळात गरजवंतांना मंडळाने फूड पॅकेट्‌स, औषधांची फवारणी, पाणीवाटप असे महत्त्वाचे कार्य केले आहे. यानंतर आता गणेशोत्सवातही मंडळाने शासकीय नियमानुसार बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चार फुटांपर्यंत मूर्ती असावी, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, या मंडळांनी यापुढे जाऊन मूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ स्थापनेची छोटी मूर्ती बसवून मूर्तीच्या ठिकाणी "थ्री डी इफ्केट'नुसार मूर्ती ठेवण्याचा विचार मंडळांचा आहे. त्यामुळे स्थापना व विसर्जन मिरवणुकीत गर्दी होणार नाही. 

अवश्य वाचा- एसटीच्या मोफत पासचा असाही साईडइफेक्‍ट; ग्रामीण शाळांतील विद्यार्थीसंख्या लागली घटू... 

आरती ऑनलाइन करून मंडपात कुणीही येणार नाही, याची दक्षता मंडळाकडून घेतली जाणार आहे. रोषणाई व मोठा मंडप यंदा राहणार नसला तरी कोरोनाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण कार्य केलेले डॉक्‍टर्स, पोलिस व अन्य घटकांच्या कार्याची दखल घेत त्यांची थीम तयार करण्याचा विचार मंडळाचा आहे. शिवाय जनजागृतीसाठी काही थीम राहणार आहे. मंडपाचा खर्च कमीत कमी करून या पैशांतून रक्तदान शिबिर, जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप, फुड पॅकेट्‌स वाटप, अन्नधान्य वाटप केले जाणार आहे. 

कोरोनामुळे यंदा शासनाने नियम निश्‍चित केले आहेत. त्या अनुषंगाने मंडळानेही या नियमांचे पालन करूनच निर्विघ्नपणे हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार दरवर्षी असणारी जवळपास दहा फुटांची मूर्ती न ठेवता छोट्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. पारंपरिक पद्धतीने रोज पूजा होईल. यंदा गर्दी टाळण्यासाठी अन्नदान राहणार नाही. मात्र, फूड पॅकेट्‌सचे वितरण रोज गरजवंतांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन केले जाईल. आरती ऑनलाइन केली जाईल. 
-मनोज पसारी, अध्यक्ष, "यवतमाळचा राजा' गणेश मंडळ, यवतमाळ.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 

loading image