
लॉकडाउनच्या काळात वर्ध्यातील नाट्यप्रतीक थिएटर ऍकेडमीने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. प्रतीक सूर्यवंशी व अंकिता वांधे कलेशी प्रामाणिक राहून हा संकल्प राबवीत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून अनेक नाट्यरसिकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. युट्युबच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात रसिकही मिळत आहेत. दररोज सायंकाळी 7 वाजता युट्युबवर याचे प्रक्षेपण केले जाते.
वर्धा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे या लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जण आपल्या घरातच बंदिस्त झाला आहे. या काळात काहींकडून वाचन, पाककला तसेच संगीत आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत; तर काही नागरिकांना यात रस नसल्याने ते कंटाळले आहेत. नाट्यरसिकांसाठी येथील युवकांनी लॉकडाउन थिएटरची कल्पना काढली. यातून त्यांनी अशा रसिकांचे मनोरंजन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
वर्ध्यातील नाट्यप्रतीक थिएटर ऍकेडमी हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकजण काही ना काही उपक्रम या लॉकडाउनच्या काळात करीत आहेत. त्याचप्रमाणेच प्रतीक सूर्यवंशी व अंकिता वांधे कलेशी प्रामाणिक राहून हा संकल्प राबवीत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून अनेक नाट्यरसिकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. युट्युबच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात रसिकही मिळत आहेत.
राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात नाटक, वेब सिरीज, कथा, कविता, चित्रपट अशा विविध कलांचे सादरीकरण केले जाते. दररोज सायंकाळी 7 वाजता युट्युबवर याचे प्रक्षेपण केले जाते. लॉकडाउन जोपर्यंत असेल, तोपर्यंत हे थिएटर सुरू राहणार आहे.
विशेष म्हणजे, सर्व कलाकार घरी राहूनच हे काम करीत आहेत. नाट्यरसिकांबरोबर अनेक दिग्गजांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. लॉकडाउनच्या काळातही नाट्यकला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळाल्याचे प्रतीक सूर्यवंशी यांनी सांगितले.
वर्ध्यातील काही नाट्य कलावंतांचे कोरोना काळात फार नुकसान झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांत बरेच कलाकार काही ना काही शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न करतात. यातून त्यांची बऱ्यापैकी मिळकत होते. शिवाय यातूनच काही नाट्यकलाकारांचीही ओळख होते. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र असे काही झाले नाही. लॉकडाउनमुळे कोणतेही शिबिर झाले नाही. यामुळे काही कलावंतांना आर्थिक फटका बसला आहे. तरीसुद्धा त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.
असं घडलंच कसं? : पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रकार सुरूच... वर्ध्यात अनर्थ टळला
या थिएटमध्ये असलेले कलावंत त्यांच्या घरी राहूनच दररोज नवनव्या विषयांवर आणि काही सिरिअलच्या माध्यमातून नाट्यरसिकांच्या पुढे येत आहेत. घरी राहून घरीच काम करून घरी अडकून असलेल्या रसिकांच्या मनोरंजनाचा हा प्रयत्न असल्याचे दिसून आले.