Unseasonal Rain : अवकाळीचे थैमान! १ हजार ५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ३ जनावरांचा मृत्यू

कारंजा तालुक्यातील पोहा व कारंजा या दोन महसूल मंडळात सोमवारी २६ फेब्रुवारीला रात्री विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Agriculture Loss
Agriculture Losssakal

कारंजा - कारंजा तालुक्यातील पोहा व कारंजा या दोन महसूल मंडळात सोमवारी २६ फेब्रुवारीला रात्री विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिवाय गारपीट देखील झाली. त्यामुळे १५३९ हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. तर लहान-मोठ्या तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकात गहू, हरभरा, टरबूज, संत्रा, ज्वारी व भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला. यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तर बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने हमी दरापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागली.

त्यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असताना त्याची भिस्त रब्बी हंगामावर होती. परंतु ऐन रब्बीतील पिके काढणीच्या अवस्थेत असताना सोमवारी रात्री अवकाळीने कहर केला आणि कारंजा महसूल मंडळातील सोहळ, गायवळ व वडगाव ईजारा या तीन गावातील २३४ हेक्टरवरील गहू, ३१२ हेक्टरवरील हरभरा, ४ हेक्टरवरील टरबूज, ३१ हेक्टरवरील संत्रा, ६ हेक्टरवरील ज्वारी व ७ हेक्टरवरील भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले.

तर पोहा महसूल मंडळातील किनखेड, देवचंडी शेवती, मांडवा, वाई, वढवी व शेलुवाडा या गावातील ४८३ हेक्टरवरील गहू, ४१२ हेक्‍टरवरील हरभरा, ६ हेक्टर वरील टरबूज, २७ हेक्टर वरील संत्रा, २ हेक्टर वरील ज्वारी व १२ हेक्टर वरील भाजीपाला असे एकूण १५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शिवाय अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पोहा महसूल मंडळातील एक बकरी, एक गोरा व एक गाय अशा तीन जनावरांचा मृत्यू झाला.

नुकसानभरपाईची मागणी

२६ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या पाऊस, हवा व गारपिटीमुळे शेवती, मांडवा, वाई, किनखेड, देवचंडी, वढवी या ठिकाणी गहू, हरभरा सोबत संत्रा, लिंबू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दत्तराज डहाके, युसुफसेठ पुंजानी, ज्ञायक पाटणी, देवानंद पवार यांनी केली आहे. या सर्वांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल वरिष्ठस्तरावर पाठविणार

तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी २७ फेब्रुवारीला ग्रामस्तरीय समितीला नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येईल. ज्या तीन जनावरांचा मृत्यू झाला, त्या पशुपालकांना ६१ हजार पाचशे रुपयांची मदत लवकरच देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com