अवकाळी पाऊस देणार "झाडीवूड'ला धक्का

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- कलाकारही चिंतित
- पिकाच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल
गडचिरोली : दिवाळी संपताच सुरू होणाऱ्या गुलाबी थंडीत झाडीपट्टी रंगभूमी अर्थात झाडीवूडला जाग येते. पण, यंदा ऐन दिवाळीत परतीच्या अवकाळी पावसाने घात केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. झाडीपट्टीत सादर होणाऱ्या नाटकांचा सर्वांत मोठा प्रेक्षकवर्ग असलेला शेतकरीच संकटात सापडल्याने आता झाडीवुडलाही याचा फटका बसणार आहे.

गडचिरोली : नाटकांची प्राचीन परंपरा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यातील झाडीपट्टीने जपली आहे. खरेतर या रंगभूमीचे नियोजनच शेतकरी केंद्रित आहे. शेतकऱ्यांच्या नियोजनाचा विचार करूनच ही रंगभूमी सक्रिय होत असते. झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांचे सादरीकरण वर्षभर होत नाही. खरीप हंगाम संपताच या रंगभूमीला नाटकांचे वेध लागतात.
झाडीपट्टीत सर्वाधिक धानाची शेती केली जाते. उन्हाळ्याच्या अखेरीपासून शेतीची कामे मशागतीने प्रारंभ होतात. त्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होताच पऱ्हे भरणे, आवत्या टाकणे, त्यानंतर बांधीत चिखलणी करणे, पऱ्हे मोठे होताच रोवणी, त्यानंतर निंदणी, खुरपणी, पिकाची राखणे अशा अनेक कामांमध्ये शेतकरी गुंग असतात. यावेळेस त्यांची तहानभूकही हरपलेली असते. संपूर्ण लक्ष शेतीकडे असते. नवरात्रापासून धान गर्भात आला की, शेतकरी झाडीपट्टी रंगभूमीच्या विचारात रमू लागतो. आता लवकरच निसवा होऊन कापलेला धान घरी येणार असतो. त्यासोबतच खरीप हंगाम संपून त्याला थोडी उसंत मिळणार असते. हा वेळ घरातील मंडळीना देणे, त्यांच्यासाठी खरेदी करणे आणि झाडीपट्टीत सादर होणाऱ्या नाटकांमध्ये आपला मनोरंजनाचा छंद पूर्ण करणे, अशी त्याची अगदी साधी स्वप्ने असतात. त्यामुळेच शेतकऱ्यांची कामे आटोपताच नटेश्‍वराचा आशीर्वाद घेत कलावंत आपल्या कसदार अभिनयाचे सादरीकरण विविध नाटकांतून करू लागतात. पण, यंदा ही रंगभूमी नाटकांसाठी सज्ज होत असताना, अनेक गाजलेल्या नाटकांच्या तालमी सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने घात केला. त्यामुळे शेतकऱ्यांसह आता झाडीवूडचे कलावंतही चिंतित आहेत.
आता उरल्या पटाच्या आठवणी
पूर्वी झाडीपट्टीत नाटकांच्या सोबतीने बैलांच्या शर्यती अर्थात शंकरपटाचा रोमांच असायचा. पण, त्यावर कायद्याने बंदी आल्यानंतर आता पटाच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत. पूर्वी सकाळी पट आणि रात्री नाटक हा पायंडाच पडला होता. आता पट नाही, पण नाटक तग धरून आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unseasonal rain will come in 'Zadiwood'