साळीने प्रेमाला नाही दिली दाद अन्‌ भाऊजी गेले तुरुंगात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह केला. मात्र, चोवीस महिन्यांतच पतीचे हृदय दुसऱ्या मुलीसाठी धडधडले. ती मुलगी पहिल्या पत्नीची बहीणच निघाली. मात्र, भाऊजींच्या प्रेमाला तिने दाद दिली नाही. त्यामुळे साळीच्या प्रेमात, भाऊजीला तुरुंगात जावे लागण्याची घटना चंद्रपुरात घडली.

चंद्रपूर : चंद्रपुरातील रहेमतनगर येथील बबलू देवराव जाधव याने दोन वर्षांपूर्वी एका मुलीशी प्रेमविवाह केला. मात्र त्याची पत्नी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याचा जीव पत्नीच्या काकाच्या मुलीवर जडला.

नात्याने ती त्याची साळी होती. तीही अल्पवयीन मुलगी आहे. तो तिला अनेकदा "प्रपोज' करायचा. मात्र, तिने त्याच्या प्रेमाला दाद दिली नाही. ती मुलगी जिल्हा क्रीडासंकुलात खो-खोचा सराव करायला जायची.

पीडित मुलीने दिली ठाण्यात तक्रार

हीच संधी साधून बुबलूही सोमवारी (ता. 2) तिथे पोहोचला. सायकलने जाणाऱ्या त्या मुलीला रस्त्यावर थांबवून त्याने पुन्हा प्रेमाचा "प्रपोज' करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने त्याला चांगलेच खडसावले. त्यामुळे तोल सुटलेल्या बबलूने तिला मारहाण केली. पीडित मुलीने घरी पोहोचल्यानंतर झाला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

हेही वाचा : तिने शपथ घेतली खरी... मात्र, प्रेमापासून स्वत:ला दूर ठेऊ शकली नाही, मग...

प्रेमवीर गेला कारागृहात

त्यानंतर कुटुंबीयांसह ती रामनगर ठाण्यात पोहोचली. बबलू जाधव विरोधात ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग आणि पोस्कोअंतर्गत बबलूवर गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे. बबलू जाधव सध्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. एका प्रेमवीराचा या घटनेने इतर मुलींनीही बोध घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unsuccesul love leads to prison at chandrapur