स्वातंत्र्यदिनापर्यंत कार्यालय दारू, तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गडचिरोली : दारूबंदी व तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व कार्यालये 15 ऑगस्टपर्यंत दारू व तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

गडचिरोली : दारूबंदी व तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व कार्यालये 15 ऑगस्टपर्यंत दारू व तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळा सप्टेंबर व ऑक्‍टोबर 2018 दरम्यान काही निवडक कार्यालयांत घेण्यात आली. पण अद्याप काही कार्यालयांमध्ये ही कार्यशाळा झालेली नाही. त्यामुळे ज्या कार्यालयात अद्याप कार्यशाळा झाली नाही; त्यांनी मुक्तिपथ चमूद्वारे आपल्या कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांकरिता दोन तासांची कार्यशाळा आयोजित करावी. कार्यशाळेचे आयोजन तत्काळ करावे. यासाठी निर्धारित केलेल्या निकषांची पूर्तता करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
15 ऑगस्टपर्यंत सर्व कार्यालये निर्धारित केलेल्या निकषानुसार दारू व तंबाखूमुक्त होणे आवश्‍यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात दारूबंदी असून तंबाखूजन्य पदार्थांवरही कायदेशीर निर्बंध आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी ही बंदी टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची आवश्‍यकता जिल्हाधिकारी यांनी व्यक्त करीत कार्यालये दारू व तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने "मुक्तिपथ' कार्यक्रम आखण्यात आला आहे. या अंतर्गत व्यापक जनजागृती केली जात आहे. मुख्यमंत्री स्वतः राज्य समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा स्तरावरही जिल्हा विकास समिती स्थापन असून जिल्हाधिकारी शेखर सिंह हे समितीचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती मुक्तिपथ कार्यालयाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Until Independence Day, directs District Collectors to exempt office liquor and tobacco