Vidhan Sabha 2019 : मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत "कत्ल की रात' 

file photo
file photo

नागपूर : प्रचारतोफा थंडावल्यानंतरही सोशल मीडियावर मात्र मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत "कत्ल की रात'सारखेच चित्र राहणार आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍप या प्रचलित सोशल मीडियावर उमेदवारांकडून एखादी अफवा पसरवून किंवा मुद्दा खोदून काढत मतदारांचे मत अंतिम क्षणी बदलविण्याची शक्‍यता आहे. सोशल मीडियावर आलेला कोणताही मुद्दा हा भावनिकदृष्ट्या साथीच्या आजारासारखा पसरत असल्याने राजकीय पक्ष किंवा उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात पोस्टबाबत रणनीती तयार करीत आहे. 
सोमवारी मतदान असून, उमेदवारांचा प्रचार शनिवारी संपुष्टात आला. पारंपरिक पद्धतीने मतदानापूर्वीची रात्रच उमेदवारांना प्रचारासाठी गुप्त बैठका, चुहा बैठका घेण्याची शेवटची संधी होती. मात्र, आता सोशल मीडियामुळे मतदार रांगेत लागला असतानाही त्याचे मत पलटण्याची संधी उमेदवारांना मिळाल्याचे सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नमूद केले. प्रचारतोफा थंडावल्यानंतरही सोशल मीडियावर ऐन मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या अफवा पसरविण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांत तरुणाईची संख्या मोठी आहे. किंबहुना सोशल मीडिया तरुणाईचे व्यसन झाले आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या नव्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरकर्ता हा एखाद्या मादक पदार्थाच्या नशेत अडकलेल्या तरुणांसारखाच आहे. 
सोशल मीडिया वापरकर्ता तरुण स्वतःबाबत जी पोस्ट टाकतो, त्यावेळी त्याच्या मेंदूचा तोच भाग उत्तेजित होतो. जो एखाद्याने मादक पदार्थ घेतल्यानंतर होतो. मेंदूमध्ये अधिक प्रमाणात "डोपाईन' अर्थात आनंदलहरी तयार करणारी स्थिती तयार होते. यातूनच सोशल मीडिया वापरकर्त्याच्या सदसद्विवेकबुद्धीवर परिणाम होतो. एवढेच नव्हे तरुणाची एखादी पोस्ट रिट्‌विट, शेअर केल्यास किंवा लाइक केल्यास त्यांच्या मेंदूवर कोकीनच्या उत्तेजनेप्रमाणे परिणाम होत असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. अहवालाचा आधार घेतल्यास सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येत असून, मतदानाच्या शेवटच्या क्षणीही मतदाराचे मत बदलू शकते, असे अजित पारसे म्हणाले. 
मतदानासाठी रांगेत उभा असलेला सोशल मीडिया वापरकर्त्याच्या ग्रुपवर आवडत्या उमेदवाराबाबत अफवा आली तर अशावेळी तो कुठलीही शहानिशा न करता विचार बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उमेदवार, राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत "कत्ल की रात'ची संधी आहे. सोशल मीडियावरील नकारात्मकता तत्काळ परिणाम करीत असल्याने आठ दिवसांपासून मत देण्यासाठी निश्‍चित केलेला उमेदवाराबाबतही तरुणाचे मत बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देशासाठी क्षमतावान नेत्याऐवजी अयोग्य नेते निवडले जाण्याची भीतीही पारसे यांनी व्यक्त केली. 
"के-स्केल'चा वापर 
सध्या अनेक सिग्नलवर वाहन थांबताच 30 सेकंदांसाठी का होईना तरुण मोबाईल काढून सोशल मीडियावर काय नवे आले याची माहिती घेताना दिसून येते. यातूनच सोशल मीडियाची व्यसनाधीनता दिसून येते. कोरियामध्ये अशा तरुणाईने मर्यादा ओलांडली. त्यामुळे तेथे इंटरनेट व्यसनाधीनतेचा स्तर मोजण्यासाठी "कोरिया स्केल' नावाचे तंत्र शोधण्यात आले. आता जगभरात हे तंत्र वापरण्यात येत आहे. तरुणाईची इंटरनेट व्यसनाधीनतेची माहिती घेण्यासाठी राजकीय पक्षांकडूनही आता तंत्राचा वापर करण्यात येत आहे. 

सध्याचा तरुण किंवा सोशल मीडिया वापरकर्ता हा सोशल मीडियावरील माहितीवर निर्भर झाला आहे. हेच हेरून उमेदवाराची प्रतिमा मलिन करणे किंवा उजळ करण्याचे प्रकार केले जात आहे. याचा परिणाम सोमवारी होणाऱ्या मतदानावर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोशल मीडियामुळे मतपेटीत मत पडेपर्यंत मतदारांची मानसिकता बदलणार नाही, याचीही आता शाश्‍वती राहिली नाही. 
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्‍लेषक. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com