esakal | दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण: अपर पोलिस महासंचालकांनी घेतला आढावा; पतीसह आईचेही बयाण नोंदवले

बोलून बातमी शोधा

null

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण: अपर पोलिस महासंचालकांनी घेतला आढावा; पतीसह आईचेही बयाण नोंदवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकारी व अपर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे या सोमवारी (ता. 26) सायंकाळी अमरावतीत दाखल झाल्या.

हेही वाचा: वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

येथील राज्य राखीव पोलिस दल बलगट क्रमांक (नऊ) येथील विश्राम भवनात त्यांनी त्यांच्या अधिनस्थ चौकशीसाठी गठित केलेल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या चमूने दोन दिवस मेळघाटात तर दोन दिवस शहरात थांबून दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणाची चौकशी केली. श्रीमती सरवदे यांनी प्रकरणाची माहिती जाणून घेतली. मंगळवारी (ता. 27) त्या मेळघाट दौऱ्यावर जातील. त्यांच्यासोबत दौऱ्यामध्ये अमरावती ग्रामीण पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिकारी जाण्याची शक्‍यता आहे. मेळघाटच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी आत्महत्या केली होती.

31 मार्च रोजी राज्य शासनाने अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या नेतृत्वात प्राथमिक चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. 30 एप्रिलपर्यंत त्यांना अहवाल शासनाकडे सादर करायचा आहे. प्रज्ञा सरवदे यांच्या चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांनी दीपाली यांच्या आई आणि त्यांच्या पतीचे बयाण नोंदविले. जो घटनाक्रम या दोघांनी तपास अधिकाऱ्यांपुढे व्यक्त केला, तशीच माहिती आयपीएस अधिकाऱ्यांच्या समिती समोरही दिली, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. हरिसाल येथून काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बघितले.

दीपाली यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचेही बयाण झाले. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन निलंबित क्षेत्र संचालक यांचे मुख्यालय हे कॅम्प परिसरात आहे. त्यांच्या कार्यालयाला चौकशी समितीच्या चमूने भेटी दिल्या. बऱ्याच जणांचे बयाणही नोंदविल्याची माहिती आहे.

हेही वाचा: नशा करण्यासाठी पितात सॅनिटायझर; मद्यपींचा अजब पर्याय जीवघेणा; वणीतील घटनेने पोलखोल

एसपींवरही घेतला होता आक्षेप

एम. एस. रेड्डी आणि गुन्हा दाखल असलेले विनोद शिवकुमार यांना पोलिस अधीक्षकांकडून झुकते माप दिल्या जात असल्याचा आरोप घटनेनंतर अनेक पक्ष, संघटनांनी केला होता. त्यानंतर आयपीएस अधिकारीच याप्रकरणाची प्राथमिक चौकशी करणार असल्यामुळे त्यांच्याकरिता हा आरोपाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, हे चौकशीअंतीच स्पष्ट होईल.

संपादन - अथर्व महांकाळ