"नोटा'चा वापर अडीचपटीने वाढला

"नोटा'चा वापर अडीचपटीने वाढला

नागपूर : शहरातील सहाही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी "नोटा'चा वापर करीत उमेदवारांना नाकारले. विशेष म्हणजे यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचाही समावेश असून सर्वाधिक वापर पश्‍चिम नागपुरात करण्यात आला. मागील निवडणुकीच्या तुलनेत "नोटा'चा वापर अडीच पटीने वाढला असून राजकीय पक्षासह विविध उमेदवारांसाठी हा इशारा असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 
एकही उमेदवार पसंतीचा नसेल किंवा कामे करणारा नसेल तर निवडणूक आयोगाने मतदारांना "नन ऑफ दी अबोव्ह'चा (नोटा) पर्याय उपलब्ध करून दिला. 2014 पासून निवडणूक आयोगाने "ईव्हीएम' मशीनवर "नोटा' हे बटण देण्यात आले. त्यामुळे आता मतदारांना या "नोटा'च्या पर्यायाबाबत माहिती समजल्याचे दिसून येत आहे. आज पार पडलेल्या मतमोजणीनंतर शहरातील सहाही मतदारसंघात 16669 मतदारांनी "नोटा'ची बटण दाबून उमेदवारांना नाकारले. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत सहाही मतदारसंघात केवळ 6148 मतदारांनी "नोटा'चा वापर केला होता. मात्र, या निवडणुकीत यात अडीचपटीने वाढ झाली. "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' असा नारा देत आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्यांनी "नोटा'चा वापर करण्याचा इशारा सरकारला दिला होता. याचाही विधानसभा निवडणुकीवर परिणाम झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शहरातील सहाही मतदारसंघात दुप्पट किंवा अडीचपटीने "नोटा'चा वापर करण्यात आला. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातही 3033 मतदारांनी "नोटा'चा वापर केला. मागील 2014 मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्‍चिममध्ये 1014 मतदारांनी "नोटा'चा वापर केला होता. पश्‍चिम नागपुरात सर्वाधिक 3702 मतदारांनी "नोटा'चा वापर केला. या मतदारसंघात विकास ठाकरे यांनी 6362 मतांनी विजय मिळवला. विजयी मतांच्या निम्मे मते "नोटा'ला गेली. पराभूत उमेदवारांसाठी सध्या तरी "नोटा'चा वापर करणारे घातक ठरले नाहीत. मात्र, हा भविष्यासाठी मोठा इशारा असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

मतदारसंघनिहाय "नोटा'चा वापर 
मतदार संघ "नोटा'ला गेलेली मते (2019) 2014 
दक्षिण-पश्‍चिम 3063 1014 
दक्षिण 2341 1276 
पूर्व 3460 1051 
मध्य 2147 930 
पश्‍चिम 3702 1143 
उत्तर 1986 734 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com