esakal | वर्धा : गळ्याला विळखा मारलेल्या सापाचा दोन तास थरार
sakal

बोलून बातमी शोधा

Snake

वर्धा : गळ्याला विळखा मारलेल्या सापाचा दोन तास थरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणी (जि. वर्धा) : झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर सलग दोन तास ठिय्या मांडून असलेल्या विषारी सापाने शेवटी त्या मुलीच्या हाताला चावा घेतला. सेलू तालुक्यातील बोरखेडी गावात ही घटना घडली असून सदर मुलीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

पूर्वा पद्माकर गडकरी (वय ६) ही तिच्या आईसोबत काल रात्री जमिनीवर अंथरूण टाकून झोपली होती. रात्री १२ वाजताच्या सुमारास हा विषारी साप दोघी मायलेकींच्या अंगावर चढला. सापाच्या हालचालींमुळे आईला जाग आली व ती बाजूला झाली. परंतु साप मुलीच्या गळ्याला विळखा घालून फणा काढून असल्याचे दिसले.

हेही वाचा: यवतमाळ : सततच्या पावसाने शेतकरी त्रस्त

त्यामुळे आईने मुलीला शांत पडून राहण्यास सांगितले. साप काढण्याचा कोणताही उपाय यशस्वी होत नव्हता. गर्दी वाढल्यामुळे सापास धोका वाटल्याने तो सुद्धा तेथून हलण्यास तयार नव्हता.

हा थरार तब्बल दोन तास चालला. रात्री २ च्या सुमारास सापाने विळखा सोडून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नात सापाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबला. त्यामुळे सापाने मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला. उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्या मुलीस तातडीने सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. सध्या ती सेवाग्राम येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

loading image
go to top