वसंतराव नाईक स्मृती राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पुसद (जि. यवतमाळ) : वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसदच्या वतीने देण्यात येणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार महाराष्ट्रातील नऊ प्रयोगशील शेतकरी व शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 40 व्या स्मृतिदिनी रविवारी, ता. 18 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी दिली.

यावेळी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहर नाईक, स्वागताध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष धनंजय सोनी, सचिव प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार, प्रा. अप्पाराव चिरडे, प्रा. गोविंद फुके उपस्थित होते. कोकणातून अनुभव शरद माजरेकर (बदलापूर, जि. ठाणे) यांना फुलशेती (उन्हाळी झेंडू), डॉ. संदीप चोपडे (संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) यांना वनशेती (बांबू), पश्‍चिम महाराष्ट्रातून अशोक दशरथ भाकरे (धामोरी, जि. अहमदनगर) यांना फळभाजी रोपवाटीका, अतुल सोपानराव तांबे (तांबेवाडी, जि. अहमदनगर) यांना विक्रमी कांदा उत्पादन, विदर्भातून किशोर खिरूसिंग राठोड (काटखेडा, जि. यवतमाळ) यांना दुग्धव्यवसाय, दादाराव जनार्दनराव पावर (ब्राह्मणवाडा थडी, जि. अमरावती) यांना विक्रमी केळी उत्पादन, राहुल गणेशराव रोंदळे (निमखेडबाजार, जि. अमरावती) यांना विक्रमी सीताफळ उत्पादन आणि ब्रॅंड मार्केटिंग, मराठवाड्यातून मेघा विलासराव देशमुख (झरी, जि. परभणी) यांना विक्रमी पेरू उत्पादन, अभिजीत मदनराव वाडेकर (मंगुजळगाव, जि. जालना) यांना विक्रमी कारले उत्पादन आदी शेतकऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी पंजाबराव देशुमख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्रा. डॉ. राजेश्‍वर रामदास शेळके यांना "दुग्धप्रक्रिया आणि मूल्यवर्धन' या विषयावर संशोधन केल्याबद्दल देण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे डॉ. चारूदत्त माई, तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर यांच्या हस्ते रविवारी, 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात करण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasantrao Naik Smriti Announces State Level Agriculture Award