वाहनधारक म्हणतात, बापरे मोडली रे कंबर !

विजय वानखेडे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

शहराच्या सर्वदूर भागात रस्त्यात खड्‌डे की खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. उखडलेल्या गिट्टी आणि रेतीमुळे वाहने आदळत आहेत. नवीन तयार झालेल्या रस्त्यावर नवीन नळ जोडणीमुळे 30फुटांच्या अंतराने अक्षरशः नाल्या तयार झाल्या. या रस्त्यावरून दुचाकी चालविताना कंबरेला इतके झटके पडतात. खोदकाम झाल्यानंतर रस्ता होता त्या स्थितीत करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची किंवा नगर परिषदेची आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

वाडी (जि.नागपूर) : वाडी नगर परिषद क्षेत्रातील नवनिर्मित सिमेंट रस्त्यावरून वाहन चालविताना झटका पडताच "बापरे तुटली रे कंबर !' असे शब्द आपोआपच बाहेर पडतात. नागपूरला संलग्नित महत्त्वपूर्ण वाडीतील बांधलेल्या सिमेंट मार्गाची स्थिती अशी गंभीर का झाली आहे.

वाडी न. प. ला स्थापून साडेचार वर्षांचा कालावधी लोटला. दरम्यान, ट्रान्सपोर्ट व्यवसाय व एमआयडीसी लागून असल्यामुळे लोकसंख्याही झपाट्याने दीड लाखाचा पल्ला गाठत पुढे गेली. मात्र "सुंदर वाडी स्वच्छ वाडी'चे रस्त्यांचे निकृष्ट बांधकामामुळे पितळ उघडे पडले. रस्ते निकृष्ट झाल्याने हा नवीन बनलेला एकही रस्ता 20 वर्षे तर दूरच पाच वर्षे तरी टिकेल काय, असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडला आहे. वाडी नगर परिषदेला अनेक योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी प्राप्त झाला. त्यातून शहरात सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, रस्त्याचे बांधकाम होताच काही दिवसातच या रस्त्याची गिट्टी बाहेर येऊन मोठमोठे खड्‌डे पडल्याने वयस्कर नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

शहराच्या सर्वदूर भागात रस्त्यात खड्‌डे की खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. उखडलेल्या गिट्टी आणि रेतीमुळे वाहने आदळत आहेत. नवीन तयार झालेल्या रस्त्यावर नवीन नळ जोडणीमुळे 30फुटांच्या अंतराने अक्षरशः नाल्या तयार झाल्या. या रस्त्यावरून दुचाकी चालविताना कंबरेला इतके झटके पडतात. खोदकाम झाल्यानंतर रस्ता होता त्या स्थितीत करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची किंवा नगर परिषदेची आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्यांची अशी स्थिती राहिली तर खरचं, वाडी स्मार्ट सिटी होईल काय, असा प्रश्‍न आहे.

नवीन नळजोडणीसाठी खोदलेले खड्‌डे न बुजविणाऱ्या कंत्राटदारांना दुरुस्तीची ताकीद देण्यात येत आहे. अन्यथा न. प.कडून दंड वसुल करण्यात येईल. नवनिर्मित सिमेंट रस्त्याचे कामे निकृष्ट केल्याबद्दल कंत्राटदारांना "कारणे दाखवा' देऊन दुरुस्तीची सूचना केली आहे. अन्यथा काळ्या सूचित टाकण्यात येईल.
जुम्मा प्यारेवाले
मुख्याधिकारी, वाडी
वाडी

वाडीत पाच वर्षांतील सिमेंट रस्त्याचे "टेंडर' देणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांची चौकशी होऊन कार्यवाही झाली पाहिजे. दोषी कंत्राटदाराची हकालपट्टी करून त्यांच्यावर कठोर दंड लावला पाहिजे.
संतोष नरवाडे
जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग
..
डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रोडचा दर्जा निकृष्ट आहे. नगराध्यक्ष, पदाधिकारी यांची मिलीभगत असून हेतुपुरस्सर कंत्राटदारांच्या कार्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हे घडले आहे. 35 लाख रुपये खर्चाचा रास्ता 6 महिन्यांत बेहाल झाला आहे.
अश्विन बैस
अध्यक्ष, युवक कॉंग्रेस, हिंगणा विधानसभा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle-holders say, 'My waist is broken!